*    आयुक्तांसह अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी *    सुपरस्पेशालिटीत आज ‘व्हीव्हीआयपी’ शिबीर *    शासकीय शिबिरांमुळे कोटय़वधींची बचत शक्य

उपराजधानीत प्रथमच शहर पोलिसांकडून आयुक्तांसह आयपीएस अधिकाऱ्यांच्या स्थूलपणा तपासणीचा भाग असलेल्या ‘बॉडी मास्क इंडेक्स’सह इतर वैद्यकीय तपासणी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आयोजित करण्यात आली आहे. याकरिता प्रशासनाकडून विशिष्ट अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार असल्या तरी पुढे हा लाभ शहरातील सामान्य नागरिकांनाही देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होणार आहेत. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचा उपक्रम राज्यभर राबवल्यास शासनाची कोटय़वधी रुपयांची बचत होणे शक्य आहे.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा देण्याची जबाबदारी शहर पोलिसांकडे आहे. शासनाकडून या कामाकरिता मोठय़ा प्रमाणावर वर्ग १ ते ४ पर्यंतच्या अधिकारी- कर्मचारींची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे वर्ग १ ते ३ पर्यंतच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकरिता विविध शासकीय व खासगी संस्थांच्या माध्यमातून शासन व स्थानिक पातळीवर विविध आरोग्य शिबिरांसह वैद्यकीय तपासणी केली जाते. सर्वसामान्यांना सुरक्षा देणारा कर्मचारी हा नेहमीच तंदुरुस्त राहावा हा त्यामागचा उद्देश असतो. या सगळ्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन सांभाळण्याकरिता शहरात सुमारे ३० आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

उपराजधानीतील पोलीस कर्मचारी व अधिकारी सतत कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणावात राहतात. अधिकाऱ्यांचेही आरोग्य निरोगी राहावे म्हणून शहर पोलीस आयुक्तांनी प्रथमच पुढाकार घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या मदतीने सगळ्यांची रक्तदाब, शुगरसह विविध विविध वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना सल्ला दिल्याची मेडिकलच्या अधिकाऱ्यांत चर्चा आहे. या तपासणीमुळे पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा ‘बॉडी मास्क इंडेक्स’ शहर पोलिसांकडे उपलब्ध होणार आहे. सोबत रक्तांसह विविध तपासणीतून प्रत्येक अधिकाऱ्यांच्या आजाराची अचूक आकडेवारी पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे.

मेडिकल प्रशासनाकडून हे शिबीर सुपरस्पेशालिटीत उद्या १८ जानेवारीला घेण्यात येत आहे. शिबिरात मेडिकलच्या सगळ्याच विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार असून ते अधिकाऱ्यांना निरोगी राहण्याकरिता विशेष सल्ला देतील. अधिकाऱ्यांकरिता हे शिबीर असले तरी भविष्यात येथे उपचार घेणाऱ्या सामान्य नागरिकांनाही असे शिबीर कशा पद्धतीने घेता येईल? यादृष्टीनेही या शिबिरातून प्रयत्न होणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचा हा पहिला उपक्रम असून हा राज्यभर राबवल्यास कोटय़वधींचा शासनाचा निधी वाचणे शक्य असल्याचे बोलले जाते.

सध्या शासनाच्या गृह विभागासह स्थानिक पोलिसांकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयातही वैद्यकीय तपासणी उपलब्ध केली जाते, हे विशेष.

प्रशासन चांगल्या सेवा देणार

शहर पोलिसांच्या विनंतीवरून मेडिकल प्रशासन सुपरस्पेशालिटीत आयपीएस अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करेल. त्याकरिता चांगल्या दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असून असेच शिबीर या संस्थेत उपचार घेणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीयांना कसे उपलब्ध करून देता येईल, त्याकरिताही प्रयत्न होईल. सगळ्यांना अद्ययावत सेवा देण्याकरिता प्रशासन कटिबद्ध आहे.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.