शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) जीवरसायनशास्त्र (बायोकेमेस्ट्री) विभागात सात महिन्यांपूर्वी मध्य भारतातील पहिल्या एन्लयाझर यंत्रासह दीड कोटींची दोन अद्यावत यंत्रे पोहोचले. परंतु या करिता लागणारी सात लाखांची कीट अद्याप मेडिकल प्रशासनाला मिळवता न आल्याने हे उपकरण धूळखात पडले आहे. रुग्णांना जुन्या यंत्रावरच चाचणी घ्यावी लागत असल्याने त्यावरील अहवालावरही तज्ज्ञ संशय घेत आहेत.
मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगडमधून रुग्ण येतात. हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, त्यांच्या आजाराचे निदान तात्काळ व अचूक होण्यासाठी मेडिकलमध्ये पंतप्रधान सुरक्षा योजनेतून अद्ययावत यंत्राची खरेदी केली जात आहे. परंतु या यंत्राला लागणारे साहित्याच उपलब्ध होत नसल्याने अनेक यंत्रे डब्यामध्येच बंद आहेत.
मेडिकलमध्ये रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे, गरिबांना चांगले उपचार मिळावेत म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेला सन २००९ साली मंजुरी मिळाली. योजनेत केंद्र सरकारचा १२५ तर राज्य शासनाचा २५ कोटींचा वाटा आहे. २०१० साली पैकी केंद्र सरकारचा ४० कोटींचा पहिला हप्ता मेडिकलच्या खात्यात आला. १०० कोटी रुपये मेडिकलला यंत्रसामुग्रीवर तर ५० कोटी बांधकामावर कर्च करायचे आहेत. त्यानुसार यंत्राची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. जीवरसायनशास्त्र विभागासाठीही याच योजनेतून बेकमन कॉल्टर या कंपनीचे पूर्णत: स्वयंचलित असलेले अद्यावत एन्लायझर यंत्राची खरेदी केली आहे. या यंत्राचे वैशिष्टय़े म्हणजे, एका तासात दोन हजार नमुने हे यंत्र तपासते. याशिवाय नमुन्याचा अहवालही अचूक देते, तर दुसरे थायरॉईडची चाचणी करणारे यंत्र सिमेन्स कंपनीचे आहे. या दोन्ही यंत्राची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. परंतु विभागात आल्यापासून ही यंत्रे डब्यातच बंद आहेत. सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, या यंत्राला विशिष्ट कंपनीचीच रिएजंट कीट लागते. वर्षांला याचा खर्च साधारण सात लाखांचा आहे. एवढा खर्च मेडिकल प्रशासनाच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु अद्याप या प्रस्तावावर हवी तशी कारवाई होताना दिसत नाही. त्याने मध्य भारतातील खासगीतही उपलब्ध नसलेल्या यंत्राचा हमीचा कालावधीही कमी होत आहे. हे यंत्र सुरू न झाल्याने या विभागाला २००७ मध्ये घेतलेल्या जुन्या यंत्रावरच अवलंबून राहावे लागत आहे. या यंत्रावर मोजकेच नमुने चाचणीसाठी लावावे लागतात. अहवाल येण्यासाठी उशीर लागतो. या मशीनवरील आलेल्या अहवालावर अनेक डॉक्टरांनी संशय व्यक्त केला असून अनेक अहवाल चुकीचेही आल्याचे बोलले जाते.

यंत्र लवकरच सुरू..
मेडिकलच्या जीवरसायनशास्त्र विभागातील उपलब्ध एन्लायझर यंत्राच्या कीटकरिता मेडिकल प्रशासनाकडून वैद्यकीय संचालकांकडे प्रस्ताव सादर झाला आहे. किटची खरेदी प्रक्रिया सुरू असून लवकरच हे यंत्र सुरू होण्यास मदत होईल, असे मेडिकलच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. जी. मुद्देश्वर यांनी सांगितले.