महापौर केवळ निर्देशीय, सभा अनिश्चित काळासाठी तहकूब

महापालिकेच्या सभेत महापौर प्रवीण दटके शहरात सोयी सुविधा देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी आणि कारवाई करण्याचे केवळ निर्देश देतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कुठलीच कारवाई केली जात नाही. सत्तापक्ष खासगी कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. या कंपन्यांवर कारवाई केव्हा? असा प्रश्न उपस्थित केला. विरोधकांनी सत्तापक्षाच्या विरोधात सभागृहात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या गोंधळातच विषय पत्रिकेवरील विषय पुकारून मंजुरी देण्यात आली आणि सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स, कनक, वंश निमयसह महापालिकेतील विविध खासगी कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सभागृहात विरोधकांनी केले असताना त्या विरोधात महापौरांनी प्रत्येक सभेत चौकशी आणि कारवाईचे निर्देश दिले. मात्र,  अजूनपर्यंत त्या संदर्भात कारवाई केली जात नाही. खासगी कंपन्यांना सत्तापक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोप करुन यांच्यावर कारवाई केव्हा करता असा प्रश्न विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सभागृहात विचारला. रस्त्यावरील खड्डय़ांसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली. मात्र, त्या समितीने काय केले. रस्त्यांच्या संदर्भात कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांना सत्तापक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. काँग्रेसचे सर्व सदस्य महापौरांच्या कक्षासमोर आले आणि घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आणि हातात फलक घेत घोषणा देणे सुरू केले. महापौर प्रवीण दटके यांनी चर्चेतून प्रश्न सोडविले जातील. असे सांगितले. मात्र, विरोधक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे विषयक पत्रिकेतील विषय पुकारून महापौरांनी सभा अनिश्चित काळासाठी सभा तहकूब केली.

काँग्रेसचे केवळ राजकारण

महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्यामुळे शहराच्या विकास कामाबाबत विरोधी पक्षाला काही देणेघेणे नाही. काँग्रेस सभागृहात गोंधळ घालून केवळ राजकारण करीत आहे. खासगी कंपन्यांची चौकशी करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असले तरी काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. रस्ते घोटाळा असो की ओसीडब्ल्यूचा घोटाळा असो, जे नियमात आहे त्याप्रमाणे जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. रस्त्याच्या संदर्भात समितीला पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता त्यामुळे हा कालावधी अजून पूर्ण व्हायचा आहे. शिवाय शहरातील विविध भागातील रस्त्यांची पाहणी अजूनही सुरू आहे. सभागृहात फलक घेऊन गोंधळ घालणे नियमात बसत नाही त्यामुळे या संदर्भात कायद्याने काय कारवाई करता येईल ती करण्यात येईल.

महापौर केवळ निर्देश देणारे, कारवाई शून्य

नागपूर विकास आघाडीमध्ये असलेल्या अपक्ष नगरसेवकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, सत्तापक्षातील ८ नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून ओसीडब्ल्यू या कंपनीने मनमानी सुरू केली. त्यामुळे महापौरांनी ओसीडब्ल्यूवर कारवाईचे निर्देश दिले तरी कुणावरीही कारवाई केली जात नाही. कनक र्सिोसेसने कोटय़वधी रुपये लाटले आहे. वंशनिमय कंपनीचा स्टार बस घोटाळा, महेश ट्रेडिंग कंपनीने स्मशान घाटावरील लाकूड घोटाळा, जॅटपॅचर, रस्ते निर्माण, नागार्जुन आदी घोटाळ्यांवर यापूर्वी महासभेत चर्चा झाली आणि महापौरांनी वळोवेळी कारवाईचे निर्देश दिले. मात्र, कारवाई केली जात नाही. रस्त्यावरील खड्डय़ांबाबत अहवाल सभागृहात ठेवण्यात आला नाही. रस्त्यावरील खड्डे संदर्भात समिती स्थापन करून पंधरा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, समितीने सभागहात अहवाल ठेवला नाही. सत्तापक्ष अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे. जोपर्यंत ओसीडब्ल्यूसह खासगी कंपन्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही.

– विकास ठाकरे, विरोधी पक्षनेते