२३ आणि २८ सप्टेंबरला मोठय़ा उल्का पृथ्वीवर आदळणार अशा बातम्या या केवळ अफवा आहेत. वास्तविकतेत नासाच्या मते ‘अपोलो २०१२-टी सी ४’ ही ३० मीटर व्यासाची उल्का पृथ्वीजवळून ३० ते ४० हजार किलोमीटर अंतरावरून जाणार आहे, पण ती केवळ १० हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याचा अंदाज काही खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत इतक्या जवळून उल्का गेली नाही. हे अंतर कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतून जात असल्याने ही उल्का पृथ्वीवर आदळू शकते, अशी भीती काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली होती.

समाजमाध्यमांवर येत्या २३ व २८ ऑक्टोबरला पृथ्वीवर उल्का आदळेल अशी भीती दर्शवणाऱ्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. त्या चुकीच्या असून येत्या ऑक्टोबरमध्ये १२ तारखेला मात्र ३० मीटर आकाराची ‘अपोलो २०१२ टीसी ४’ ही उल्का आतापर्यंत पृथ्वीजवळून गेलेल्या उल्केपेक्षाही जवळून म्हणजे केवळ १० हजार किलोमीटर अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. नासाच्या मते ३० ते ४० हजार किलोमीटर अंतरावरून ती जाणार आहे. त्यामुळे ही उल्का पडण्याचा धोका काही वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. नासा आणि इतर खगोल संस्था या उल्केच्या मार्गावर आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या उल्केचा शोध ‘पेनस्टार-१’ या दुर्बिणीने ‘हवाई’ या ठिकाणावरून लावला. २०१२ मध्ये हीच उल्का पृथ्वीच्या ९४ हजार किलोमीटर अंतरावरून गेली होती. त्याचप्रमाणे ‘२०१२ डीए-१४’ ही उल्कासुद्धा अगदी जवळून गेली होती. याच महिन्यात १ सप्टेंबरला ‘क्यू.टी’, २ सप्टेंबरला ‘क्यू.आर. ३२’ तर ६ सप्टेंबरला ‘आर बी’ ह्या तीन उल्का जवळून गेल्या होत्या. २ सप्टेंबर २०१७ ला ‘अटेन २०१४ क्यू.बी.-३५’ ही उल्का जवळून म्हणजे एक लाख किलोमीटर अंतरावरून गेली होती. हे अंतर पण धोक्याच्या कक्षेत येते.

आतापर्यंत पृथ्वीला धोकादायक अशा १५०० उल्का शोधण्यात आल्या आहेत. पृथ्वीच्या इतिहासात आतापर्यंत मोठय़ा १५० उल्कांची विवरे   सापडली.

महाराष्ट्रातील लोणार येथे प्रचंड मोठी उल्का पडून विवर तयार झाले आहे. अलीकडील काळात रशियातील तुंगस्का येथे १९०८ रोजी मोठी तर २०१३ मध्ये लहान उल्का पडली होती. १२ ऑक्टोबरला पृथ्वीजवळ येणारी ३० मीटर आकाराची उल्का भविष्यात पडल्यास हिरोशिमा शहरावर पडलेल्या बॉम्बच्या चाळीस पट इतकी तिची क्षमता राहील आणि प्रचंड विनाश होईल. १२ ऑक्टोबरची ही उल्का अगदी जवळून गेली तरी पृथ्वीवर पडणार नाही, असा नासाचा अंदाज आहे.

सर्व खगोल वैज्ञानिक या उल्केच्या मार्गावर असून लवकरच त्याची माहिती दिली जाणार असल्याने नासाने सांगितले आहे, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.