पंधरा दिवसांत एकही शस्त्रक्रिया नाही; रुग्ण प्रतीक्षेत

बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्र मिळूनही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) शस्त्रक्रियेत नापास झाले. या रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांत एकही शस्त्रक्रिया झाली नाही. अवयव प्रत्यारोपण जनजागृतीवर शासन कोटय़वधींचा खर्च करीत आहे. मेयोतील बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्राला सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी नसल्याचा प्रकार लोकसत्ताने पुढे आणला होता. आरोग्य विभागाने ४ ऑक्टोबरला मंजुरी दिल्यावरही मेयोच्या नेत्र विभागाला पंधरा दिवसांत एकही बुब्बुळ मिळवून शस्त्रक्रिया करता आली नाही. त्यामुळे बरेच रुग्ण नवीन दृष्टीला मुकल्याने डॉक्टरांना बुब्बुळ प्रत्यारोपणात रस नाही काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १,५४७ तर नागपूरला केवळ १०० बुब्बुळ प्रत्यारोपण झाले. त्यातील ३२ शस्त्रक्रिया मेडिकलमध्ये झाल्या असून इतर प्रत्यारोपण विविध खासगी रुग्णालयांतील आहे. या शस्त्रक्रिया वाढाव्या  जेणेकरून अनेक दृष्टिहिनांना दृष्टी मिळेल म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून अवयवदानाला प्रोत्साहन देण्याकरिता प्रत्येक वर्षी जनजागृती मोहीम राबविली जाते. महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन या मोहिमेला मोठे स्वरूप दिले आणि जनजागृतीवर तब्बल ४ कोटी रुपयांचा खर्च केला. त्या अंतर्गत नागपूरच्या मेडिकल, मेयो, सार्वजनिक आरोग्य विभागासह इतरही शासकीय, सामाजिक व खासगी संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.

शासनाचे धोरण असल्याने सगळ्या शासकीय विभागांनीही जास्तीत जास्त अवयव प्रत्यारोपण कसे वाढणार व शासकीय संस्थांमध्ये प्रत्यारोपणाची सोय वाढावी म्हणून स्वत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनच बुब्बुळ प्रत्यारोपण वाढण्याच्या कामात अडथळा निर्माण केला जात असल्याचा प्रकार लोकसत्ताने पुढे आणला होता. त्या अंतर्गत मेयोच्या नेत्र विभागाने त्यांच्याकडे बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्राकरिता २०१२ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडे अर्ज सादर केल्यावरही त्यावर काहीच झाले नव्हते. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षाने शहरातील शेकडो अंध नवीन दृष्टी मिळण्यास मुकत होते.

मेयो प्रशासनाकडून त्यांच्या नेत्र विभागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून ते बुब्बुळ प्रत्यारोपण करू शकत असल्याचे सांगण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून मंजुरी नसल्याने त्यांना ही शस्त्रक्रिया करता येत नव्हती. या वृत्ताची दखल घेत मेयोच्या बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्राला शासनाने ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली. मेयोत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने तातडीने बुब्बुळ मिळून या विभागात शस्त्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. या उपक्रमाने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र कळले असते. परंतु या विभागाला अद्याप एकही बुब्बुळ मिळवून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आली नाही. तेव्हा या विभागाला ही शस्त्रक्रिया करून नवीन रुग्णांना दृष्टी देण्यात रस नाही काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विषयावर मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी वाहाणे (गजभिये) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

मेयोच्या नेत्रविभागाला बुब्बुळ प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाल्यामुळे येथील डॉक्टर केव्हाही शस्त्रक्रिया करण्यास तयार आहेत. परंतु बुब्बुळ उपलब्ध झाले नसल्याने काही अडचणी आहेत. त्यातच दिवाळीच्या सुटय़ा असल्याने काही डॉक्टर सुट्टीवरही गेले आहेत. दिवाळी झाल्यावर तातडीने बुब्बुळ मिळवण्यासह शस्त्रक्रिया सुरू केल्या जातील. प्रशासनाकडे प्रतीक्षा यादीही तयार आहे.

– डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो