केंद्रात राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसोबत कार्यकारिणीत भाजप नेते संजय जोशी यांच्यासह काही नवीन चेहरे येण्याच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. या भेटीत संजय जोशी यांचा कार्यकारिणी प्रवेश आणि त्यांच्यावर देण्यात येणाऱ्या जबाबदारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली.
भाजपचे एकेकाळचे शीर्षस्थ नेते आणि मधल्या काळात गुजरातमधील राजकारणाचे बळी ठरलेले भाजपचे नेते संजय जोशी गेल्या काही दिवसांत पक्ष संघटनेत सक्रिय नसले तरी त्यांनी छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात मधल्या काळात संघटना बांधणीसाठी केलेले काम पाहता या आपल्या कामातून त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. मात्र त्याच काळात ते राजकारणाचे बळी ठरले आणि पक्षापासून काही काळ दूर राहिले. राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर जोशी यांनी पुन्हा सक्रिय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र पक्षपातळीवर त्यांना कुठेच स्थान देण्यात आले नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी सरसंघचालक आणि रा. स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती. मात्र पक्षातील शीर्षस्थ नेत्यांचा विरोध बघता कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार असल्याचे नागपूर भेटीत त्यांनी सांगितले होते.
सुमारे दीड वर्षांनंतर पुन्हा सक्रिय होऊ पाहात असताना रा. स्व. संघाकडून तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा करताना त्यांनी विविध विषयांसह संजय जोशी यांच्या कार्यकारिणी प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय जोशी राष्ट्रीय राजकारणात यावे, त्यासाठी संघ प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत रा. स्व. संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी जोशी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत योग्य स्थान दिले जाईल, असे विधान केले. गेल्या काही दिवसांत जोशी दिल्लीत असून त्यांनी अनेक भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती समोर आली.

..तेव्हा दानवे गडकरींच्या वाडय़ावर
नितीन गडकरी व सरसंघचालकांच्या या भेटीत राज्याच्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवरही चर्चा झाली. शिवाय गडकरी यांच्या खात्याकडून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती सरसंघचालकांना देण्यात आली. ज्या वेळी गडकरी सरसंघचालकांकडे होते त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नितीन गडकरी यांच्या वाडय़ावर बसून होते, हे विशेष.