तीन लाखांच्या कर्जाचे काही महिन्यातच झाले २५ लाख; हुडकेश्वर पोलिसांचे गुंडांना संरक्षण?

अवैध सावकारीविरुद्ध राज्य सरकारने कडक कायदा केला आहे. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने सावकारांची मुजोरी सुरूच आहे. अशाच एका सावकाराने जानेवारी महिन्यात तीन लाखांचे कर्ज देऊन काही महिन्यातच तुघलकी व्याजदर आकारून एकूण हिशेब २५ लाखांवर पोहोचविला आहे. त्यामुळे कर्ज घेणारा आणि त्याच्या मित्राने हात टेकले असून पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने कर्ज घेणाऱ्याच्या मित्राच्या तीन माळ्याच्या घरात घुसून गुंडागर्दीने घरावर कब्जा केल्याचा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात उघडकीस आला आहे.

राजेंद्र नत्थुजी राऊत (४५) आणि त्यांचे कुटुंबीय हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील श्यामनगर परिसरात राहतात. भूखंड क्रमांक-१८ वर त्यांचा तीन माळ्याचे टुमदार घर आहे. जानेवारी-२०१६ मध्ये राजेंद्र यांचा मित्र प्रल्हाद शेंबेकरला पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे राजेंद्रने मध्यस्थी करून त्याला अंजीर कांबळे नावाच्या सावकाराकडून ३ लाख रुपये कर्ज मिळवून दिले.

त्याच महिन्यात प्रल्हादने दीड लाख रुपये परत केले. परंतु तोपर्यंत कांबळेने तुघलकी व्याज आकारला आणि आता एकूण ६ लाख फेडावे लागतील असे सांगितले. त्यामुळे प्रल्हादने हात टेकले. त्यानंतर कांबळेने काही महिन्यातच १५ आणि २५ लाख असा हिशेब लावला. त्यानंतर कर्ज मिळवून देणारा राजेंद्र असल्याने कांबळे राजेंद्रला त्रास देऊ लागला. आपला पैसा वसूल करण्यासाठी कांबळेने एप्रिलमध्ये राजेंद्र यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घर ६ लाख ५० हजारात आपल्या नावाने लिहून घेतले. त्यानंतरही राऊत कुटुंब त्याच घरात असल्याने १८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास कांबळे हा आपल्या २०च्यावर गुंडासह घरात घुसला आणि राजेंद्रची पत्नी सरिता आणि त्याच्या आईला मारहाण करून घरातील सर्वाना घराबाहेर काढले. त्यानंतर घराला कुलूप लावले.

यासंदर्भात सरिता यांनी १०० क्रमांकावर नियंत्रण कक्षाला माहिती दिली. हुडकेश्वर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. परंतु त्यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी राऊत कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात नेले आणि तक्रार लिहून घेतली.

या प्रकरणात पोलिसांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करण्याचा गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपी मोकाट आहेत. तर राऊत कुटुंबीय स्वत:च्याच घराबाहेर असून घर मिळविण्यासाठी आता दिवाणी खटला दाखल केला आहे. या सर्व घटनाक्रमावरून गुंडांना पोलिसांचेच संरक्षण असल्याचा आरोप राऊत कुटुंबीय करीत आहेत.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी केवळ गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. अधिक माहिती आपल्याला नंतर कळवितो म्हणून भ्रमणध्वनी कापला.