वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात घडलेल्या भीषण घटनेची माहिती प्रसिद्धी माध्यमांकडून मेडिकल व मेयो प्रशासनाला कळल्यावर दुपारनंतर दोन्ही संस्थेतील आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर वाढवण्यासह आवश्यक औषधे पोहोचल्याची माहिती आहे. लोकसत्ताकडून सार्वजनिक आरोग्य विभागाला विचारणा झाल्यावर दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोग्यसेवेकडून दोन्ही संस्थांना अधिकृत दक्षतेची सूचना देण्यात आली.
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराला सोमवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान अचानक आग लागली. या घटनेत मोठय़ा संख्येने डिफेन्स सिक्युरिटी क्रॉप्सच्या जवानांचा मृत्यू, तर अनेक जवान व कर्मचारी गंभीर व किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता सावंगी आणि सेवाग्रामच्या रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पैकी काही गंभीर रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासल्यास उपचाराकरिता नागपूरच्या मेडिकल, मेयोसह मोठय़ा रुग्णालयात हलवण्याची शक्यता नकारता येत नाही. तेव्हा लोकसत्ताने मेडिकल, मेयोच्या अधिष्ठात्यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांना कोणतीही सूचनाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
प्रसिद्धी माध्यमांनी विचारल्यावर दोन्ही संस्थांकडून दुपारनंतर आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर वाढवण्यासह आवश्यक सर्जिकल साहित्य व औषधे पोहोचवण्यात आले. दुपारनंतर दोन्ही रुग्णालयातील २० ते ३० खाटा आरक्षित करण्यात आल्या. मेडिकलमध्ये नुकतेच ट्रामा केअर सेंटरचा शुभारंभ झाल्याने येथेही काही खाटांची व्यवस्था केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना विचारल्यावर त्यांनी दुपारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना सूचना दिल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाकडून सावंगी व सेवाग्रामला पथके पाठवले असून ते तेथील रुग्णालय प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली.