खासदार नाना पटोलेंचा घणाघात; मासेमारी- शेतकरी संपर्क अभियान सभा

राज्य शासनाने ३० जूनला मनमानी अध्यादेश काढून राज्यातील मच्छिमारांची फसवणूक केली आहे. या सरकारवर गुन्हे दाखल करायला हवे, असा घणाघात भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केला. शहरात शनिवारी आयोजित मासेमारी-शेतकरी संपर्क अभियान सभेत ते बोलत होते.

राज्यातील मच्छिमारांवर सरकार सातत्याने अन्याय करीत आहे. या मच्छिमारांच्या संस्थेला दिली जाणारी कंत्राटे ही तलावातील पाण्यावर दिली जातात. परंतु वास्तविकतेत बहुतांश तलावांमध्ये १२ महिने पाणी राहत नाही. विदर्भातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश तलावात तर दोन महिनेही पाणी साठा राहत नाही. तेव्हा काही महिने राहणाऱ्या तलावातील पाण्यापोटी सरकार मच्छिमारांकडून १२ महिन्याचे पैसे वसूल करत आहे. ही मच्छिमारांची फसवणूक आहे. सरकारने ३० जूनला काढलेल्या अध्यादेशात स्थानिक मच्छिमारांची गळचेपी करणाऱ्या जाचक अटी आहेत. त्यात मच्छिमारांना दिल्या जाणाऱ्या कंत्राटाचे दरही अनेकपटींनी वाढवले गेले. या अध्यादेशाचा राज्यातील ८० हजार कुटुंबांना फटका बसला आहे.

या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकतीच मुंबईला बैठक झाली. याप्रसंगी या खात्याचे मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. त्यांना हा अध्यादेश गरीब मच्छिमारांच्या फायद्याचा कसा? असे विचारले असता बरोबर उत्तर देता आले  नसल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अध्यादेशात दुरुस्तीकरिता समिती बनवली आहे. त्यात मच्छिमारांच्या संघटनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. सरकारकडून मच्छिमारांच्या बाजूने निर्णय झाला तर ठीक, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा पटोले यांनी केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांत दौरे करून मच्छिमार आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पटोले म्हणाले.  सरकार कौशल्य विकास प्रशिक्षणातून तरुणांना नवीन रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे स्थायी व्यवसाय चुकीच्या धोरणाने बंद करून  बेरोजगारी वाढण्याची शक्यता दिसत आहे. याप्रसंगी व्यासपीठावर अशोक बर्वे, प्रकाश लोणारे, प्रशांत पवार, प्रफुल्ल पाटील, चंद्रपाल मेश्राम, देवदास चवरे, मनू दत्ता, रामदास पडवळ, यशवंतराव दिघोरे उपस्थित होते.

दिल्लीत अनेक खासदार संपत्तीसाठी

दिल्लीत अनेक खासदार हे संपत्तीसाठी पदावर आल्याचे दृष्य आहे. सात पिढय़ांनाही पुरेल एवढी संपत्ती त्यांनी कमावली आहे. परंतु मी लोकांचे काम करण्यासाठी खासदार झालो आहे. या पदावर राहून लोकांचे काम करता आले नाही, तर ते पद माझ्या कामाचे नाही. त्यामुळेच मी राजीनाम्याची भाषा बोललो होतो. परंतु सध्या कामे होतील अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत कुणाच्या खात्यात १ ते ५ रुपयांपर्यंतची राशी आली. राज्यात अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणीही नाना पटोले यांनी केली.