• खासगी बसमध्ये क्षमतेहून दुप्पट प्रवासी, ऑटो चालकाकडूनही जादा भाडे आकारणी
  • १,७७८ खासगी वाहने उपलब्ध केल्याचा प्रशासनाचा दावा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी दुप्पटीने भाडे आकारणे सुरू केली असून नादुरुस्त वाहनेही रस्त्यावर आणली आहते. क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी घेतले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्य़ात १,७७८ खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दिवाळीच्या सुटीत अनेकजण त्यांच्या मूळ गावी जातात. त्यांना एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी एस.टी.ची एकही फेरी गेली नाही. शहरातील गणेशपेठ, मोरभवन आणि जिल्ह्य़ातील विविध बसस्थानकांवर प्रवासी गेले, परंतु एस.टी. अभावी त्यांना प्रवासाचा बेत रद्द करावा लागला. काहींनी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडला. परंतु त्यांना दुप्पट, तिप्पट प्रवासी भाडे मोजावे लागले. सर्वसामान्य प्रवाशांची लूट सुरू असतानाही प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांची भरारी पथके कुठेच दिसली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. दुसरीकडे ऑटोचालकांनीही दरवाढ करून लुटीत भर घातली. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही.

संपाच्या दुसऱ्याही दिवशी गणेशपेठ आणि इतर बसस्थानकांवर संपकर्त्यां कर्मचाऱ्यांनी एसटी बसेसच्या टायरची हवा सोडून त्या प्रवेश व निकासी द्वारावर आडव्या लावण्यात आल्या. खासगी बसेसला स्थानकांवर प्रवेश दिला नाही. त्यामुळे गणेशपेठ बसस्थानकांवर आंध्र प्रदेशचा परवाना असलेल्या दोन खासगी बस दिवसभर अडकून पडल्या. दुसऱ्या दिवशी स्कूलबस, स्टारबस शहराबाहेर सोडण्यात आल्या. रामटेक बसस्थानकावर स्टारबसने प्रवेश केल्यावर तेथील आंदोलकांनी बसच्या चाकातील हवा सोडली.

क्रेनच्या साखळीने गळफास घेण्याचा प्रयत्न

गणेशपेठ बसस्थानकावर आंदोलकांनी आडव्या केलेल्या एसटी बसेस हटवण्यासाठी प्रशासनाने सायंकाळी क्रेन आणली. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी परिसरात ठिय्या दिला. दरम्यान, काही कर्मचारी बसवर चढले. त्यापैकी एकाने गळ्यात क्रेनची साखळी घालून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

गोंदियापर्यंत विशेष रेल्वे- जिल्हाधिकारी

संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी इतवारी रेल्वेस्थानकाहून गोंदियासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. गोंदियासाठी गुरुवारपासून सकाळी ८.३० वाजता गाडी निघेल. ती इतवारी, कळमना, कामठी, कन्हान, सालवा, तारसा, रेवराल, खात, भंडारा, कोका, तुमसर, मुंडीकोटा, तिरोडा, काचेवानी, गंगाझरी, गोंदिया या रेल्वेस्थानकांवर थांबणार आहे. तसेच गोंदिया ते नागपूर परतीच्या प्रवासाकरिता गोंदियावरून सायंकाळी ४.३० वाजता ही गाडी सुटणार असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी ४०० ट्रक

संपावर पर्याय म्हणून बुधवारी जिल्ह्य़ात सुमारे १,७७८ खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरू होती. या वाहनांकडून अवास्तव भाडे आकारणीच्या तक्रारी आल्यावर भरारी पथकाला यात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑटोरिक्षा चालकही लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ४०० ट्रक प्रवासी वाहतुकीसाठी गुरुवारी सज्ज ठेवण्यात आले आहे.

शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)