महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने महापालिकेच्यावतीने १६ ते १९ डिसेंबरदरम्यान ‘नागपूर महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सुरुवात अशोक हांडे यांच्या ‘आजादी ७०’ या कार्यक्रमाने तर समारोप फरहान अख्तर यांच्या जादूई सुरांनी होणार आहे. महोत्सवात शंकर महादेवन यांची संगीतमय कटय़ार रसिकांच्या काळजात घुसणार असून, ‘चला हवा येऊ द्या’चा तडका महोत्सवाला बसणार आहे. महापालिकेच्या दहा विभागात मुशायरा ते कवी संमेलनापर्यंत दहा वेगवेगळे कार्यक्रम आणि सोबतच नागपूकरांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवासाठी कार्यक्रमस्थळाचे भूमीपूजन ११ डिसेंबरला यशवंत स्टेडियमवर करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या लोगोचे उद्घाटन पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थी व खुल्या गटाकरिता ‘ग्रॅफिटी वॉल’स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘नीरी’च्या भिंतीवर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात आला होता. आता स्पध्रेच्या रूपाने हा प्रयोग मोठय़ा प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. यासंदर्भातल्या प्रवेशिका महापालिकेच्या प्रत्येक विभाग, महाविद्यालय तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रवेशिका १४ डिसेंबपर्यंत भरून द्यायच्या आहेत. १८ डिसेंबरला सकाळी सहा तास चार समूहात ही स्पर्धा होईल.

१२ डिसेंबरला स्क्रॅप कलावंत नागपुरात येणार असून टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक वस्तू तयार करण्यात येतील. १३ डिसेंबरपासून त्यांच्या कलेला सुरुवात होईल आणि त्यातून साकारलेल्या वस्तू गरजेनुसार शहरातील विविध चौकात ठेवण्यात येतील. शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील आर्किटेक्टसाठी डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सवरेत्कृष्ट डिजाईननुसार कामे केली जातील.

मोमिनपुऱ्यात मुशायरा तर गांधीबागेत कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नागपूर सुधार प्रन्यास तसेच मेट्रोनेही नागपूर महोत्सवाकरिता सहकार्य केल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक संदीप जोशी तसेच रवींद्र देवतळे हे देखील उपस्थित होते.

 

महोत्सवातील कार्यक्रम असे

’  १६ डिसेंबर – सायंकाळी ६.३० वाजता

‘आजादी ७०’ – संकल्पना, लेखन, दिग्दर्शन अशोक हांडे व सहकारी

’  १७ डिसेंबर – सायंकाळी ६.३० वाजता

‘चला हवा येऊ द्या’ – मराठी लबाडी, नाटक व नृत्य

’  १८ डिसेंबर – सायंकाळी ६.३० वाजता

‘कटय़ार टू कजरारे’ – गायक, संगीतकार, अभिनेता शंकर महादेवन

’  १९ डिसेंबर – सायंकाळी ६.३० वाजता

‘बॉलिवूड म्युझिकल कॉन्सर्ट’ – गायक, लेखक, दिग्दर्शक अभिनेता फरहान अख्तर

 

’  अशोक हांडे यांचा ‘आजादी ७०’

’  फरहान अख्तर यांचे जादूई सूर

’  शंकर महादेवन यांचे गायन

’  ‘चला हवा येऊ द्या’चा तडका