• गाणी वाजवण्यावरून झाला वाद
  • वडिलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण हा आनंदाचा सण. मात्र, त्या दिवशीही नागपुरात खुनाची घटना घडली. होम थिएटर वाजवण्याच्या कारणावरून चार शेजाऱ्यांनी मिळून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. तर त्याच्या वडिलांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कुणाल दयालू खेरे (१९) रा. पुंजाराम वाडी, डिप्टी सिग्नल असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचे वडील दयालू खरे (४५) हे जखमी असून त्यांच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो)  उपचार सुरू आहेत.

प्रेमलाल बंडू कोटले (४५), आशीष ऊर्फ चेतराम प्रेमलाल कोटले (२०), रोशन प्रेमलाल कोटले (२६) आणि मनोज ऊर्फ लंगडा प्रेमलाल कोटले (२५) सर्व रा. पुंजाराम वाडी, डिप्टी सिग्नल, अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली. मृत व आरोपी एकमेकांचे शेजारी असून ते मजुरीचे काम करतात. गुरुवारी दिवाळीनिमित्त ते घरीच होते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. त्यावेळी कुणालने स्वत:च्या घरी होम थिएटरवर मोठय़ा आवाजात गाणी वाजवण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवीदेवतांवरची गाणी वाजत होती, परंतु देवीवरील गाणे ऐकल्यानंतर प्रेमलाल यांच्या नवीन सुनेच्या अंगात देवी येत असल्याचे कारण सांगून त्यांनी कुणाल व त्याच्या वडिलांसोबत भांडण केले. यातून आरोपींनी संगनमत करून दोघेही बापलेकांना मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाकूने कुणालच्या पोटावर व छातीवर वार केले. त्याच्या वडिलांचाही खून करण्याचा प्रयत्न केला, परंतु परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी केल्याने आरोपी पळून गेले. त्यानंतर जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले, तर दयालू यांच्यावर उपचार सुरू आहेत. कमळना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.