डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचा दावा

संस्कृत भाषेसंदर्भात समाजात अनेक गैरसमज असले तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा प्रस्ताव संविधान सभेच्या बैठकीत मांडला होता. ही वास्ताविकता आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी केला.

डॉ. श्रीधर वर्णेकर यांची जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि अभ्यंकरनगर नागरिक मंडळाच्या वतीने सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात रविवारी आयोजित ‘मानवंदना’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष राम खांडवे, ज्ञानेश्वर शेंद्रे, रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते. संविधान सभेतील मुस्लीम सदस्यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. त्यावेळी कुणीही ही ब्राह्मणांची भाषा आहे, असे म्हटले नव्हते, तर ही एकतेची भाषा अशीच त्यांची भावना होती, असेही डॉ. जोशी म्हणाले.

संस्कृत अनिवार्य करा

देशात जोपर्यंत संस्कृत भाषेचा अभ्यास अनिवार्य केला जाणार नाही, तोपर्यंत भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या मानसिकेतून पडणार नाही. आम्ही रालोत काळात केंद्रीय शिक्षण मंडळात संस्कृत अनिवार्य करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु राजकारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही. सरकारने आज त्यादृष्टीने पावले टाकल्यास दहा ते पंधरा वर्षांत भारत ज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील प्रगतीत खूप पुढे गेलेला असेल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

संघगीत दूरदर्शनवर प्रसारित व्हावे- गडकरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत सामाजिक आणि राष्ट्रीय प्रेरणा देणारे आहे, असे सांगत ते दूरदर्शनवरून प्रसारित करण्याची विनंती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना केली आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. संस्कृत भाषेतील हे गीत वेगवेगळ्या लोकांनी लिहिले आहे. मात्र, अजूनही अनेकांना ही बाब माहिती नाही. केंद्रात आपले सरकार असल्याने संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे गडकरी म्हणाले.