आरोपींना झटपट श्रीमंत व्हायचे होते -उच्च न्यायालयाचे निरीक्षण
रुग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणात डॉ. मुकेश चांडक यांच्याकडून सर्व कर्मचाऱ्यांसमोर झालेल्या अपमानाचा सूड उगविण्यासाठी राजू दवारेने मित्र अरविंद सिंग यांच्या मदतीने युगचे अपहरण करून खून केला. खुनानंतर त्यांनी डॉ. मुकेश चांडक यांना भ्रमणध्वनी करून खंडणीही मागितली. यावरून आरोपींना झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी एका निष्पाप मुलाचा वापर केला. या घटनेनंतर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुलांचे आईवडील मुलांना शाळेत पाठवायला घाबरत होते. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन सर्व साक्षीपुराव्यावरून त्यांनी केलेला गुन्हा अतिशय घृणास्पद असून त्यांना समाजात परतण्याची संधी देता येऊ शकत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिला.
युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांचे वर्धमानगर येथे दंत रुग्णालय आहे. राजेश हा त्यांच्या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होता. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून तो उपचार शुल्काशिवाय शंभर ते पाचशे रुपये अधिकचे वसूल करायचा. एक दिवस युग हा रुग्णालयात कॉम्प्युटरवर गेम खेळत असताना राजेशने त्याला मारले होते. त्यावेळी डॉ. चांडक यांनी राजेशला चांगलेच खडसावले होते आणि पुन्हा असे कृत्य न करण्याची तंबी दिली होती. याशिवाय राजेश हा रुग्णांकडून शुल्का व्यतिरिक्त अधिकचे पैसे उकळायचा. एका रुग्णाने त्याची तक्रार केली होती. त्यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला कामावरून काढून टाकले. त्यावेळी रुग्णालयाचा गणवेश म्हणून राजेशला मिळालेली लाल रंगाची टी-शर्ट त्याने परत केली नव्हती, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.
या अपमानाचा सूड उगविण्याची योजना राजेशने आखली. त्यासाठी युगच्या अपहरणाची योजना आखली. ही योजना तडीस नेण्यासाठी अरविंद सिंग आणि संदीप कटरे यांना सामील करून घेतले होते. परंतु घटनेच्या दिवशी संदीप त्यांच्यासोबत गेलाच नाही. युगच्या माध्यमातून डॉ. मुकेश यांच्याकडून १० कोटी रुपये मिळतील आणि आपण श्रीमंत होऊ, अशी लालसा त्यांच्यात होती. योजनेनुसार युग हा सेंटर पॉईंट शाळेत शिकतो. तो दुपारी ४ च्या सुमारास स्कूलबसमधून घरी येतो. डॉ. चांडक दाम्पत्य व्यस्त असल्याने युगला घेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी जातात. त्यामुळे सोमवार, १ सप्टेंबर २०१४ ला शाळा सुटल्यानंतर सायंकाळी ४.३० च्या सुमारास युग हा घरासमोर शाळेच्या बसमधून उतरला. त्यावेळी राजेशने अरविंदला डॉ. चांडक यांच्या रुग्णालयाचा गणवेश असलेली लाल रंगाची टी-शर्ट घालून स्कुटीवर युगला घ्यायला पाठविले. युग बसमधून उतरताच राजेशने त्याला आवाज दिला. यानंतर युगने शाळेची बॅग चौकीदाराकडे सोडली आणि रुग्णालयात जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो राजेशच्या स्कुटी-पेप गाडीवर बसून निघाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर राजेशही गाडीवर बसला. रुग्णालयाचा रस्ता सोडून राजेश हा दुसऱ्या मार्गाने गाडी घेऊन जात असल्याचे युगच्या लक्षात आले. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला असता युगच्या पाठीमागे बसलेल्या राजेशने युगचे तोंड दाबले. आपली ओळख पटू नये म्हणून रस्त्यात त्यांनी लाल रंगाची टी-शर्ट काढून फेकली. तसेच गाडीही बदलून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. यातून आरोपींनी अतिशय योजनाबद्धपणे अपहरण आणि खुनाच्या घटनेला तडीस नेले, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

असा झाला घटनेचा तपास
कुश कटारियाच्या अपहरण-खून प्रकरणातील अनुभवातून धडा घेतल्यानंतर नागपूर पोलिसांनी तीव्र गतीने तपासाची चक्रे फिरवली. चौकीदाराने दिलेल्या माहितीवरून अपहरणकर्ता डॉ. चांडक यांच्या रुग्णालयाचा गणवेश घातलेला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या आणि नोकरी सोडलेल्या
जवळपास ४० जणांची यादी तयार केली. त्यांना दूरध्वनी करून पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. त्याच सुमारास राजेशलाही पोलिसांनी बोलविले. त्यावेळी राजेश हा युगला घेऊन पाटणसावंगी परिसरात होता. पोलिसांचा भ्रमणध्वनी येताच राजेशने युगला संपविण्याचा निर्णय घेतला. लोणखरी गावाजवळच्या नाल्याखाली नेऊन त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह वाळूमध्ये पुरला.
त्यानंतर राजेशने अरविंदला त्याच्या घरी सोडले आणि डॉ. चांडक रुग्णालयात पोलिसांसमोर हजर झाला. त्यावेळी पोलिसांचा राजेशवर संशय होता. पोलिसांनी राजेशला रुग्णालयातून जाण्यास सांगितले आणि त्याच्या हालचालींवर नजर ठेवली. डॉ. चांडक यांच्या रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर राजेशने दोन वेगवेगळया ठिकाणाहून डॉ. मुकेश चांडक यांना दूरध्वनी केला आणि प्रथम १० कोटी व दुसऱ्यांदा ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर २ सप्टेंबर २०१४ ला राजेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने युगच्या खुनाची माहिती दिली. त्याच दिवशी रात्री ७.३० च्या सुमारास राजेशने पोलिसांना युगचा मृतदेह दाखविला.

घटनाक्रम
– १ सप्टेंबर २०१४
४.३० वाजता युगचे अपहरण
५ वाजता पोलिसांत तक्रार
५.३० वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी
६.१५ वाजता राजेशला पोलिसांचा दूरध्वनी
६ ते ६.३० दरम्यान युगचा खून
७.३० वाजता राजेश रुग्णालयात हजर
८ वाजता राजेशला सोडले
१० च्या सुमारास १० कोटींच्या खंडणीचा दूरध्वनी

– २ सप्टेंबर २०१४
सकाळी ११ वाजता पुन्हा खंडणीसाठी दूरध्वनी
संध्याकाळी ५ वाजता पोलिसांनी राजेशला ताब्यात घेतले
संध्याकाळी ६ वाजता राजेशची अपहरण आणि खुनाची कबुली
संध्याकाळी ७ वाजता राजेशने युगचा मृतदेह दाखविला
रात्री ११ च्या सुमारास युगचा मृतदेह मेडिकलमध्ये ठेवला

– ३ सप्टेंबर २०१४
सकाळी १० वाजता शवविच्छेदन
दुपारी १२ वाजता अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रा
दुपारी २ च्या सुमारास अंत्यसंस्कार
२८ नोव्हेंबर २०१४ न्यायालयात आरोपपत्र दाखल
३० जानेवारी २०१६ आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध
३ फेब्रुवारी २०१६ आरोपींच्या शिक्षेवर सर्व पक्षांचा युक्तिवाद
४ फेब्रुवारी २०१६ सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.

कायद्याचा विजय
सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर मनात धाकधूक होती. परंतु कायद्यांवर विश्वास होता. परंतु आजच्या उच्च न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. या शिक्षेमुळे लोकांमध्ये कायद्यावरील विश्वास अधिकच मजबूत होईल. यानंतर कोणाच्याही मुलाचे अपहरण करून खून करताना आरोपींच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल आणि असा प्रसंग कुणावर ओढवणार नाही. हा कायद्याचा विजय आहे.
– डॉ. मुकेश चांडक

न्याय झाला
उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणातील निकालांचा दाखल देत उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आपण आनंदी असून चांडक परिवाराला न्याय मिळाला आहे.
– भारती डांगरे, सरकारी वकील