महिनाभरातच दवेंचे मतपरिवर्तन कसे?, पर्यावरण अभ्यासकांना प्रश्न

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचा आधार घेत केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री अनिल दवे यांनी सुमारे महिनाभरापूर्वी नागपूर शहरावर प्रदूषणाचा ठपका ठेवला होता. एवढेच नव्हे तर या शहरातील हवा आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे वक्तव्य त्यांनी देशाच्या राजधानीत केले होते. मात्र, त्यांनीच आता त्यांच्या वक्तव्यापासून पाठ फिरवली आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता सूचकांकाचा आधार घेऊन त्यांनी प्रदूषणाच्या बाबतीत नागपूर शहराला समाधानकारक शहरांच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे दवेंच्या पहिल्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा की महिनाभरातच दिलेल्या दुसऱ्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांना पडला आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूरने अजूनपर्यंत हवेतील प्रदूषणाचा घटक असलेल्या ‘ऑक्साईट्स ऑफ नायट्रोजन’ची पातळी एकदाही ओलांडली नाही. याउलट इतर शहरांनी ‘पार्टीकुलेट मॅटर’ व ‘ऑक्साईट्स ऑफ नायट्रोजन’ हे दोन्ही प्रदूषणाचे घटक ओलांडले. त्यामुळे केंद्रीय मंत्री दवेंनी ज्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणाचा आधार घेतला, ते सर्वेक्षणच मूळात दोन मानकांच्या आधारावर करण्यात आले होते. जेव्हा की हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी बारा मानके असतात. पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी लोकसत्ताजवळ या सर्वेक्षणातील त्रुटी मांडून दवेंचे विधान खोडून काढले. अवघ्या काही दिवसातच भारतीय हवामान खाते आणि भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेने त्यांच्या अहवालात शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात आम्लाची मात्रा वेगाने वाढत असल्याचे सांगितले. मात्र, येथेही हवामान अभ्यासकांनी मानकांबाबत गफलत केली आणि ग्रीन विजिल या पर्यावरण अभ्यासक संस्थेने मानकांच्या चुका दाखवल्यानंतर दिलेल्या अहवालाबाबत माघार घेतली. नागपूर शहरावर अलीकडच्या काही महिन्यात वारंवार होणाऱ्या प्रदूषणावरील आरोपाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री दवे यांनी चक्क नागपूर शहराला प्रदूषणाच्या रांगेतून बाहेर काढले आणि प्रदूषणाबाबत समाधानकारक शहरांच्या यादीत नेऊन बसवले. त्यामुळे अवघ्या महिनाभरातच दवेंचे मतपरिवर्तन कसे, असा प्रश्न पर्यावरण अभ्यासकांना पडला आहे.

हवेची गुणवत्ता अतिशय खराब असणाऱ्या शहरांमध्ये आग्रा, जोधपूर, गुडगाव, गया, पुणे, सोलापूर, चंद्रपूर आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक असणाऱ्या शहरांमध्ये नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई, ठाणे, अहमदाबाद, मुंबई, विशाखापट्टणम, बंगळुरू, हैदराबाद, पेंचकुला, हल्दीया, तिरुपती, रोहटक, हावरा आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]