दिवसा उन्हं आणि सायंकाळपासून मात्र अलगद अंगावर पावसाच्या सरी असा अनुभव सध्या नागपूरकरांसह विदर्भातील जनता घेत आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर या आठवडाभरापासून कोसळणारा अवकाळी पाऊस म्हणजे त्यांच्यासाठी दिलासा आहे. मात्र, मे महिन्यातील उष्णतेच्या लाटेचा धोका टळलेला नाही, असा इशाराही हवामान खात्याने आणि हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
उन्हाळयाचा मध्यान्ह म्हणजेच मे महिन्यात डोक्यावर सूर्य असल्याने उष्णतेच्या प्रचंड लाटा अंगावर झेलतच सर्व कामे पार पाडावी लागतात. या महिन्यात सायंकाळही घामाघूम करणारी असते. यावर्षी ज्या वेगाने तापमान वाढले, तो वेग बघता एप्रिलच्या अखेरीस मे महिन्याच्या तापमानाच्या नोंदीचा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, वातावरण अचानक बदलले आणि या सर्व शक्यतांना छेद गेला. एप्रिलच्या अखेरपासून दुपारनंतर आकाशात ढग आणि सायंकाळी वादळी पाऊस असा दिनक्रमच ठरून गेला आहे. ढगांनी आक्रमिलेले आकाश आणि कोसळणाऱ्या धारा असा सुखद अनुभव उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेली वैदर्भीय जनता घेत आहे. या अवकाळी पावसाने दिलासा दिला असला तरीही आजारांना आमंत्रण देण्याचा हा प्रकार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरवर्षी उन्हाळयात एकदा अवकाळी पाऊस येतोच, पण यावेळी तो आठवडा झाला तरी जायलाच तयार नाही. वादळीवारा व गारपिटीसह बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे जीवित आणि वित्तहानीसुद्धा अनुभवली. हा अवकाळी पाऊस म्हणजे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा परिणाम असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. प्रचंड उष्णता निर्माण झालेली असताना पश्चिमेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि परिणामी पाऊस कोसळतो. पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणारे वारे एकमेकांना भिडल्यास त्याचाही परिणाम अवकाळी पावसाच्या रूपाने पाहायला मिळतो. अवकाळी कोसळलेल्या पावसाने गावांमधील अनेक घरांवरचे छप्पर हिसकावले. तर संत्रा, आंबा यासारख्या फळांचे मोठे नुकसानदेखील केले. या आठवडय़ाच्या अखेपर्यंत अवकाळी पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याने फळबागाधारकही चिंतेत आहेत. तर शहरातील नागरिक पाऊस गेल्यानंतर तापणाऱ्या उन्हाचे काय यामुळे चिंताग्रस्त आहेत.