वादग्रस्त ‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेले या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात  सकाळी पाठशिवणीचा खेळ रंगला. या चित्रपटाला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भांडारकर यांची नियोजित पत्रकार परिषद होऊ दिली नाही. हॉटेलपुढे गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी भांडारकर थांबलेल्या हॉटेलकडेही धाव घेतली, परंतु त्या आधीच ते (भांडारकर) येथून विमानतळाकडे रवाना झाले होते.

तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनाक्रमांवर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट बेतला असून त्यातून गांधी कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी पुण्यातील भांडारकर यांची पत्रकार परिषद काँग्रेसने उधळून लावली होती. रविवारी नागपुरातही तसाच प्रकार घडला. उत्तर अंबाझरी मार्गावरील पोर्ट ओ गोम्झ येथे सकाळी ११.१५ वाजता भांडारकर यांची पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते सकाळी  नागपुरात दाखल झाले.  दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेवक संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजताच पत्रपरिषद स्थळी येऊन गोंधळ घातला.

अखेर आयोजकांनी पत्रपरिषद रद्द केली.  दरम्यान भांडारकर येणार नसल्याचे कळल्यावर संतप्त काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषनाबाजी करायला लागले. ‘मधुर भांडारकर मुर्दाबाद’, ‘आरएसएस मुर्दाबाद’, ‘इंदिराजी का हर बलीदान, याद रखेगा हिंदुस्थान’ हे नारे देणे सुरू असतांनाच आंदोलकांना भांडारकर रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये थांबल्याचे कार्यकर्त्यांना कळले. त्यांनी तिकडे धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर ते वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये असल्याचे कळले. आंदोलक तेथेही पोहोचले. मात्र कार्यकर्ते पोहोचण्यापूर्वीच भांडारकर तेथून विमानतळावर निघून गेले होते. कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांनी  प्रतिक्षयालयासह इतर ठिकाणी भांडारकरांचा शोध घेतला. मात्र ते त्यांना मिळाले नाही. त्यानंतर या चित्रपटाचे काही कलावंत हॉटेलमध्ये असल्याचे कळताच  आंदोलक पुन्हा तेथे पोहचले. परंतु तेथे कोणीही आढळले नाही. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांचयात शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान भांडारकर मुंबईला परत गेले नाही. ते मिहानजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. तेथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले.

आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?

मधुर भांडारकरांचा राहुल गांधींना सवाल

राहुल गांधी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलतात, मग तेच स्वातंत्र्य आम्हाला नाही का? असा सवाल ‘इंदू सरकारचे’ दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी केला. या आशयाचे ट्व्टि आपण राहुल गांधींना केल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भांडारकर यांची सकाळची पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावल्यानंतर सायंकाळी काही मोजक्या पत्रकारांशी त्यांनी संवाद साधून आपली भूमिका मांडली.  ‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक आणि ३० टक्के वास्तविकतेवर आधारित आहे. आणीबाणीच्या काळातील ती परिस्थिती जगापुढे येत असेल तर काँग्रेस कशासाठी घाबरते, असा सवाल त्यांनी केला. या विषयावर पुस्तके, नाटके लिहिली गेली आहेत. त्यांना कधीच जाब विचारण्यात आला नाही मग, आम्हाला का? राहुल गांधी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलताात. मग, आमच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे काय ? असे व्ट्टि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना केल्याचे भांडारकर म्हणाले. काँग्रेसने हा हास्यास्पद प्रकार थांबवावा. यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात फिरावे लागत आहे त्यांच्या या कृतीमुळे आम्हाला अहमदाबाद, बंगळूरू येथील पत्रपरिषदा रद्द कराव्या लागल्याचेही स्पष्ट केले. प्रदर्शनाआधी चित्रपट त्यांना दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सेन्सॉर बोर्डाने आम्हाला १७ कट सांगितले. ते मान्य नाही. आम्ही पुनर्विचार समितीकडे जाणार आहोत. काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवावा. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर जे विश्वास ठेवतात, त्यांनी हा चित्रपट पाहावा. माझे भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे. त्यांच्या कार्यक्रमात जात असतो.  या चित्रपटाच्या माध्यमातून कुणाच्या चारित्रहननाचा प्रयत्न नाही, यासंदर्भातील आरोपही चुकीचा आहे. तशा प्रसिद्धीची मला गरज नाही, असे भांडारकर यांनी स्पष्ट केले.

.तर चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही- विकास ठाकरे

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चित्रपट दाखवल्यावर व त्यात काही वादग्रस्त नसल्याचे स्पष्ट झाल्यावर चित्रपट प्रदर्शित करा, असे मधुर भांडारकर यांना सांगण्यात आले होते. परंतु त्यांचे वर्तन बघता ते भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटातून देशाकरिता बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असून ते काँग्रेस सहन करणार नाही. भांडारकर हे देशात कुठेही गेले तरी त्यांचा काँग्रेस विरोध करेल व चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल.

– विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस, नागपूर</strong>