एसी बंद, डबेही निखळले; नागपूरकर महिला डॉक्टरचा खडतर प्रवास

देशातील सवरेत्कृष्ट रेल्वेगाडी असा नावलौलिक असलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील अतिशय खडतर प्रवासाचा अनुभव नागपूरकर एका डॉक्टर कुटुंबीयांना अनुभवयास आला. दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा संपूर्ण प्रवासात बंद होते आणि नागपूरपासून चार तासांच्या अंतरावर इंजिनपासून रेल्वेडबे निखळले. अशा एकापाठोपाठ एक अप्रिय घटना घडल्याने ‘राजधानीतून प्रवास नको रे बाबा’ असे म्हणण्या वाचून राहिले नाही.

देशाची राजधानी आणि विविध राज्यांच्या राजधानीच्या शहराला जोडणारी राजधानी एक्सप्रेस देशातील क्रमांक एक रेल्वेगाडी आहे. या गाडीची गती इतर गाडय़ांपेक्षा अधिक असते. ती पूर्णपणे वातानुकूलित असते. तसेच भाडे देखील इतर गाडय़ांच्या तुलनेत अधिक असते. ही गाडी वेळेत चालवण्यासाठी इतर गाडय़ांना थांबवून ठेवण्यात येते किंवा तसे वेळेचे नियोजन केले जाते. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणे प्रतिष्ठेचे मानले जाते. परंतु अलीकडच्या काळात राजधानी असो वा इतर कोणतीही गाडी, वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड, मळकट चादर, टॉवेल, निकृष्ट दर्जाचे जेवण आदी तक्रारी होत असतात.

नागपूरकर डॉ. अर्पणा महाकाळकर यांचा अनुभव तर भयानक होता. त्या १२४३४ दिल्ली- चेन्नई राजधानी एक्सप्रेसमध्ये सकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास नागपूर स्थानकावरून चढल्या. त्यांना लगेच लक्षात आले की, त्यांच्या ‘बी २’ डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. दिल्लीहून बसलेल्या प्रवाशांकडून कळले की, बुधवारी दुपारी ३ वाजतापासूनच एसी बंद आहे. यासंदर्भात प्रवाशांनी तक्रार केली, परंतु त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. राजधानी असल्याने साखळी खेचून गाडी थांबवता येत नाही. टीटीई त्याबद्दल सांगितले तर तो म्हणतो, माझे तिकीट तपासणीचे काम आहे. येथील इलेक्ट्रीशियन एसी बंद असल्याचे लिहून द्यायला तयार नाही. उकाडय़ात प्रवास सुरू असताना नागपूरपासून सुमारे चार तासांच्या अंतरावर इंजिनपासून रेल्वेडबे निखळले. इंजिन सुमारे ७ किलो मीटर पुढे निघून गेला. हे लक्षात आल्यानंतर परत इंजिन मागे घेऊन डबे जोडण्यात आले, असे डॉ. अर्पणा महाकाळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

रेल्वेडबेही निखळले

नागपूर स्थानकावरून निघाल्यानंतर सुमारे चार तासांचा प्रवास झाला असेल. इंजिनपासून रेल्वेचे डबे निखळल्याचे लक्षात आले. तोपर्यंत इंजिन सुमारे ७ किलो मीटपर्यंत पुढे निघून गेला होता. लक्षात आल्यानंतर इंजिन मागे घेऊन डबे जोडण्यात आले. बंद डब्यात असल्याने प्रवाशांना आधी कळले नाही. गती कमी झाल्याने काहींनी बाहेर बघितल्यावर ही बाब समोर आली. या प्रकाराने प्रवासी भयभीत झाले होते.

‘‘दिल्ली-चेन्नई राजधानी एक्सप्रेसच्या ‘बी २’ डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. या डब्यात पंखे नाहीत. गुदमरल्यासारखे होत आहे. गरोदर महिला, लहान मुले प्रवास करीत आहेत. प्रवाशांनी टीटीई, कोच अटेडन्टकडे यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या. पर्यवेक्षक सिद्दीकी हे शेवटचा थांबा आल्याशिवाय एसी दुरुस्त होणार नसल्याचे सांगत आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी अर्धा तास उभी होती. तेथे देखील एसी दुरुस्त करण्यात आले नाही.’’

– डॉ. अर्पणा महाकाळकर, रेशीमबाग, नागपूर