नव्या प्रभाग रचनेत चारही नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामे करायची आहेत. त्यासाठी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांनी शुक्रवारी फडणवीस यांची त्यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सदस्यांचे अभिनंदन करतानाच लोकांनी भाजपवर दाखविलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, सदैव जनतेसोबत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला. निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर रात्री फडणवीस नागपुरात आले होते. त्यांनी पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती व रात्री त्यांचा येथे मुक्काम होता. निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. यावेळी खासदार अजय संचेती, दक्षिण-पश्चिमचे प्रभारी प्रा. राजीव हडप, सरचिटणीस संदीप जोशी, श्रीपाद बोरीकर, आशीष पाठक, सचिन कराळकर, संपर्क प्रमुख विवेक तरासे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.