नागपूर महापालिका निवडणुकीत प्रगती पाटील विजयी तर अनिल धावडे पराभूत

विदर्भातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी मिळावी म्हणून दुसऱ्या पक्षात ऐन वेळी केलेला प्रवेश काहींच्या पथ्यावर पडला, तर काहींच्या पदरी निराशा आली.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षबदलाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या  प्रगती पाटील यांनी ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश केला व या पक्षाकडून त्यांनी निवडणूकही जिंकली. मात्र भाजपने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेकडून लढणारे अनिल धावडे या निवडणुकीत पराभूत झाले.

वर्धा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पिंपरी जिल्हा परिषद गणातून ते विजयी झाले. मात्र भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सुनीता इथापे यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या वंदना फटिंग यांनी निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली, पण मतदारांनी त्यांना नाकारले.

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चेतन पवार आणि बसपामधून भाजपमध्ये गेलेले अजय गोंडाणे विजयी झाले. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे विनोद मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते सुद्धा विजयी झाले. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या उषा विरक यांनाही पक्षबदल पथ्यावर पडणारा ठरला.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अमर बोल्डरवार हे भाजपमध्ये गेले होते. त्यांच्या पत्नीला या पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. त्या विजयी झाल्या. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते प्रशांत बाम्बोळे यांनी भाजपत प्रवेश करून पत्नी शीतलसाठी उमेदवारी मिळविली. शीतल विजयी झाल्या आहेत.

यवतमाळ जिल्हा परिषदेतही आयाराम-गयाराम प्रवृत्तीला काही ठिकाणी विजय, तर काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले योगेश पारवेकर, संध्या इंगोले, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या लता निकम यांचा पराभव झाला, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अमेय नाईक, अमोल लोणकर, रेणू शिंदे विजयी झाले.

गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे काही उमेदवार तरले, काही हरले..

विदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्वपक्षीय गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे उमेदवार काहीजिंकले, तर काही पराभूत झाले. जिंकणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे फिरोज खान विजयी झाले, तर आझाद खान (काँग्रेस) व नसीर खान (राष्ट्रवादी काँग्रेस) पराभूत झाले. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीतील विद्यमान उपमहापौर शेख जफर शेख जब्बार (काँग्रेस) पराभूत झाले. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रसचे हरीश ग्वालबंशी, अनिल पांडे, किशोर गजभिये, प्रशांत धवड पराभूत झाले. शिवसेनेचे अनिल धावडे पराभूत झाले. वर्धा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात येत असलेले विद्यमान जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे (भाजप), विलास दौड (काँग्रेस),  मिलिंद भेंडे (भाजप) पराभूत झाले. चंद्रपूर जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले विनोद अहिरकर (काँग्रेस), बंडोपंत मल्लेलवार (अपक्ष), श्रीमती पराते (ग्रामसभेचे उमेदवार) पराभूत झाले, तर सैनू गोटा (ग्रामसभेचे उमेदवार) हे कारागृहात असतानाही विजयी झाले.