उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि मोठय़ा प्रमाणावर झालेली बंडखोरी, यावर मात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील महापालिकेत निर्भेळ यश संपादन केले. सर्व स्तरावर एकाच पक्षाची सत्ता असली की, विकास करणे सोयीचे जाते, हा भाजपकडून झालेला प्रचार उपराजधानीत पक्षाला फायदेशीर ठरला.

पाच वर्षांपूर्वी भाजपला पालिकेत पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. या वेळी ती कसर या नेत्यांनी भरून काढली. पालिकेची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे, हे लक्षात घेऊन फडणवीस व गडकरी यांनी राज्य, तसेच केंद्राकडून भरपूर निधी मिळवला व विकासाची अनेक कामे सुरू केली. त्याचा फायदा या पक्षाला मिळाला. येथे भाजपसमोर काँग्रेसने उभे केलेले आव्हान अजिबात तगडे नव्हते. तरीही भाजप नेत्यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली. स्वत: फडणवीसांनी प्रभागाप्रभागांत प्रचारसभा घेतल्या. गडकरी तर येथेच तळ ठोकून बसले होते. पक्षातील नाराजांना समजवण्यासाठी ते गल्लीबोळात फिरले. त्याचा अपेक्षित परिणाम निकालात दिसून आला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. संघाचे काही स्वयंसेवकही बंड करून रिंगणात होते. त्याचा कोणताही प्रभाव निकालावर पडला नाही. या शहराचा महापौर कुणीही असला तरी सत्तेचे नेतृत्व आमच्याकडेच राहणार आहे, हा संदेश प्रचाराच्या माध्यमातून देण्यात फडणवीस व गडकरी यशस्वी ठरले. मेट्रो रेल्वे, अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना भूखंड देणे, रस्त्यांची कामे व मिहानला मिळालेली गती, यामुळे मतदारांनी भाजपवर पुन्हा विश्वास टाकल्याचे या निकालाने दाखवून दिले.

  • या वेळी बहुजन समाज पक्षात येथे फूट पडल्याने दलित मतांना खेचून घेण्याची चांगली संधी काँग्रेससमोर होती. नेत्यांनी आपापसातील भांडणाने तीही घालवली.
  • काँग्रेसने शहराध्यक्ष विकास ठाकरेंच्या मताप्रमाणे उमेदवार दिले, त्या ठाकरेंचाच पराभव झाला. भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले, पण त्याचा मोठा परिणाम भाजपला मिळालेल्या यशावर झाला नाही.
  • येथील मतदारांनी पक्षापेक्षाही फडणवीस व गडकरी यांच्याकडे बघून मतदान केले, हे या निकालातून दिसून आले.
  • राष्ट्रीय, तसेच राज्य पातळीवर गाजत असलेले मुद्दे, नोटाबंदीसारखा विषय प्रचारात चर्चेला येऊनही मतदारांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही व भाजपच्या पारडय़ात भरभरून मते टाकल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे.