नागपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गाच्या तिहेरीकरणाला वेग आला असून या मार्गावरील महत्त्वाच्या तिगाव-चिंचोडा सेक्शनचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अत्यंत व्यस्त असलेले सेक्शन सुरू झाल्यास पॅसेंजर ट्रेनच्या प्रवाशांना दिलासा आणि मालवाहतुकीत वाढ होणे अपेक्षित आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

नागपूर रेल्वेस्थानक मार्गे देशाच्या चारही दिशांना आणि महानगरांना रेल्वेगाडय़ांची ये-जा आहे. याशिवाय उत्तर-दक्षिण असा रेल्वे वाहतुकीसाठी नागपूर ते इटारसी हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील प्रवासी तसेच मालवाहतूक गेल्या वर्षांत वाढली आहे. त्यामुळे अनेकदा पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहतुकीच्या गाडय़ांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून एक्सप्रेस आणि मेल गाडय़ांना मार्ग मोकळा करून दिला जातो. त्यामुळे पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मालगाडय़ांना थांबवून ठेवल्याने रेल्वेला वर्षांला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागते. यामुळे चार वर्षांपूर्वीच नागपूर-इटारसी मार्गावरील तिगाव-चिंचोडा हा मालवाहतुकीसाठी महत्त्वाचे सेक्शन तिहेरी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली.

सोबतच धाराखो ते मरमझरी घाट सेक्शन (१२.७५ कि.मी.) आणि इटारसी-नागपूर (२६७ कि.मी.) या संपूर्ण मार्गाचे तिहेरी करण्यास मान्यता मिळाली. याशिवाय नागपूर रेल्वेस्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वेने येथून हावडा, बल्लारशहा, वर्धा आणि इटारसी रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथा रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामांना मान्यता दिली आहे. नागपूर ते बल्लारशहा चौथा मार्ग आणि कळमना ते राजनांदगाव तिसऱ्या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. नागपूर-इटारसी दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी २,८८२.९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ऑगस्ट २०१६ ला मान्यता मिळालेल्या या मार्गाचे काम पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या मार्गावरून नवीन मेल किंवा एक्सप्रेस चालवणे फारच कठीण झाले आहे. नागपूर-आमला-इटारसी सेक्शनमध्ये वाहतूक आणि प्रवासी वाहतूक वाढत आहे. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर आधीच काही गाडय़ांना विलंब होत असतो.

तिगाव-चिंचोडा सेक्शन २४ महिन्यात

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिसऱ्या मार्गावरील तिगाव ते चिंचोडा या सेक्शनमध्ये रेल्वेमार्गाचे डिझाईन, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) सुरू करण्यासाठी तसेच या सेक्शनमधील दुहेरी मार्गावरील ‘ओएचई’मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता २३ मार्च २०१७ ला निविदा काढली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २७ एप्रिल असून हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]