नागपूर जिल्ह्य़ातील रामटेकच्या हमलापुरी येथील एक तरूण आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करायला गेला होता.मात्र तब्बल दीड महिन्यांनी नागपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या अचूक तपासामुळे घरी परतला. कुटुंब एकत्र येताच सगळ्यांना डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

प्रवीण हीरालाल बंधाटे असे तरुणाचे नाव आहे. तो गावा लगतच्या राईस मिलमध्ये काम करायचा. ३० मे ला प्रवीण कामावर गेला मात्र परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या नरबळी किंवा त्याचा खूनाची चर्चा गावात पसरली. घरच्यांनी रामटेक पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी तपास सुरू केला. रामटेक येथील राखी तलावा जवळ त्याची दुचाकी आणि चप्पल मिळाली. मात्र, शव मिळाले नाही. पोलीस अधीक्षक शैलेश बलकावडे यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. पोलिसांनी तलावाजवळीस सिंदीच्या वनात शोध मोहिम राबवली. सीसी टिव्ही तपासले. पथकाने कोकण तसेच मुंबईच्या अनेक भागात तपास केला. शेवटी प्रवीण कांदीवलीमध्ये एका ठिकाणी काम करत असल्याचे पुढे आले. शेवटी प्रवीणला ताब्यात घेवून पोलिसांनी घरच्यांना सोपवले.

प्रवीणच्या घरची आर्थिक स्थिती बरी नाही. घरी वृद्ध आई, वडील आणि बहिण असे त्याचे कुटुंब आहे. वडील दुसऱ्याची शेती करतात. प्रवीण हा घरी आणि शेतीत मदत करायचा. कुटुंबाची जवाबदारी त्याच्यावर होती. अशातच प्रवीणने दुचाकी घेतली. त्याची ५ हजार रुपये मासिक किस्त, कुटुंबाचा खर्च, बहिनीच्या लग्नाकरीता पैशाची जुळवाजुळव केली. त्याची आर्थिक गाडी रुळावरून भरकटली. आर्थिक अडचणीत सापडलेला प्रवीण आत्महत्या करण्याकरिता घरून निघाला. त्याने मुंबई गाठली. कांदिवलीच्या ओम स्वीट मार्टमध्ये तो काम करू लागला. पोलिसांना माहिती मिळाल्यावर शेवटी त्यांनी प्रवीणला घरी आणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक पोलीस बलकावडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखान यांच्या मार्गदर्शनात संजय पुरंदरे, उल्हास भुसारी, विशाल पाटील, राजेंद्र सनोडिया, शैलेश यादव, अमोल वाघ, चेतन राऊत, विशाल चव्हाण, अमोल कुथे यांनी पार पाडली.