जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोचे ६० टक्के काम पूर्ण

चिनी बनावटीचे पण नागपूरमध्ये तयार होणारे डबे घेऊन धावणाऱ्या नागपूर मेट्रोचे नवे संकल्पचित्र नागपूर मेट्रो रेल्वे महामंडळाने जारी केले आहे. खापरी ते विमानतळ या जमिनीवरून धावणाऱ्या टप्प्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

एकूण ५.६ किलोमीटर जमिनीवरून आणि ३२.६ किलोमीटर अंतर सिमेंट खांबावर टाकण्यात आलेल्या रुळावरून पूर्ण करणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे विमानतळ ते बर्डी या दरम्यान आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ८२.७ टक्के जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यामुळे गतीने काम करण्यास महामंडळाला मदत झाली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण ४८ सिमेंट खांब उभारणीचे काम पूर्ण झाले. त्यावर ९ सिमेंट ग्रीड बसविण्यात आले. मेट्रो स्थानक उभारणीचे कामही यासोबतच सुरूकरण्यात आले आहे.

दरम्यान, मेट्रो रेल्वेचे डबे तयार करण्याचे काम चीनच्या सीआरसीसी या कंपनीला देण्यात आले. ही कंपनी पहिल्या टप्प्यात ६९ डब्याचा पुरवठा ७८ ते १८२ आठवडय़ात करणार आहे. स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, टेलिकम्युनिकेशन, रूळ टाकणे, स्वयंचलित तिकीट आदी कामांच्या निविदा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मिहान आणि हिंगणा येथे उभारण्यात येणाऱ्या देखभाल दुरुस्ती डेपोच्या निविदेचीही कामे शेवटच्या टप्प्यात आहे.

‘छत्रपती’चा पूल कापून काढणार

मेट्रो रेल्वेच्या मार्गात अडसर ठरणारा छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडण्याऐवजी तो कापून काढला जाणार आहे. केवळ १५ दिवसात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. १५ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होईल. त्यासाठी वाहतूक वळविण्याचेही नियोजन तयार आहे. अजनी चौकापासून नवीन पूल बांधण्यात येणार आहे त्यासाठी जुना पूल तोडणे आवश्यक आहे. मात्र हे काम जलद गतीने करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुलावरील स्लॅब तोडण्यात येईल त्यानंतर पिल्लरला कटरद्वारे कापून वेगळे केले जाईल. त्याच वेळी मलबा उचलण्याचेही काम केले जाईल.