जर्मन बँकेकडून घसघशीत अर्थसहाय्य मिळाल्यानंतर आता नागपूर मेट्रो रेल्वेचे फ्रान्सच्या ‘एएफडी’ बँकेसोबत एक हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी प्रयत्न सुरू असून पुढील महिन्यात या संदर्भात करार होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ८ हजार ६८० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करायचा असून त्यासाठी विदेशी बँकांकडून अर्थसहाय्य घेतले जात आहे. जर्मनी आणि फ्रान्स बँकांनी यासाठी अनुकूलता दर्शविली होती. त्यापैकी १ एप्रिल २०१६ ला जर्मन बँक के. एफ.डब्ल्यू.ने मेट्रोसाठी ३७५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलेआहे. आता फ्रान्सच्या ए.एफ.डी. बँकेकडून १ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव आहे. यापूर्वी फ्रान्सच्या शिष्टमंडळाने नागपूरला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आहे. मेट्रो रेल्वे व्यवस्थापन आणि फ्रान्स बँक यांच्यात प्राथमिक पातळीवर चर्चा ही झाली असून पुढील महिन्यात कर्जाच्या संदर्भात करार होण्याची शक्यता, मेट्रोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
प्रकल्पाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ही काही सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. मेट्रो मार्गाच्या बाजूला असणाऱ्या इमारतींसाठी अतिरिक्त ‘एफएसआय’ मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, मेट्रोसाठी लागणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या ताब्यातील जागा हस्तांतरणाचे काम सुरू असून ६७ हेक्टर जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे. हे प्रमाण प्रकल्पाला लागणाऱ्या एकूण जागेच्या ७७ टक्के आहे. रेल्वे स्थानकासाठी लागणाऱ्या खासगी जागेचे हस्तांतरण केले जात आहे. जनरल कन्सल्टन्ट नियुक्तीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाचे जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचे काम पूर्ण झाले आहे.
मे २०१५ पासून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील ४.६ किलोमीटरच्या खांब उभारणीचे काम सुरू असून उत्तर-दक्षिणच्या ५.६ किलोमीटरच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहेत. रेल्वेच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील खापरी ते काँग्रेसनगर या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ९ रेल्वे स्थानकाचे आराखडे तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.
बांधकाम गुणवत्ता पूर्ण तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे तसेच ते वेळेत पूर्ण व्हावे म्हणून गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेसोबत करार करण्यात आला असून ५ डी ही प्रणाली कामाच्या निर्धारित वेळेवर लक्ष ठेवून आहे.
सीताबर्डी येथे मेट्रोच्या जंक्शनस्थळी उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी जागतिक पातळीवरून निविदा मागविण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम करणाऱ्या कंपन्यानांच यात सहभागी होण्याची अट असून त्यांनी इमारतीच्या संदर्भात आराखडे सादर केले आहेत. या संदर्भातील निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

मेट्रोची वाटचाल
प्रकल्पाला केंद्राकडून मान्यता – जानेवारी २०१४
कामाचे भूमिपूजन –                  ऑगस्ट २०१४
जर्मन बँकेकडून कर्ज मंजुरी    -१ एप्रिल २०१६