विकासाच्या मुद्यावर पक्षीय भूमिका बाजूला सारत एकत्र येणे हा राजकारणातला आदर्शवाद झाला. सध्या तो अभावानेच दिसतो. विदर्भाचा विचार केला तर हा आदर्शवाद राजकारणातून कधीचाच हद्दपार झाला आहे. विदर्भ मागास का राहिला व विकास का झाला नाही, याला बऱ्याच अंशी ही हद्दपारी कारणीभूत आहे. केवळ समोरच्याला श्रेय मिळेल, या स्वार्थी हेतूने चांगल्या कामात अडथळा निर्माण करण्याची पद्धत विदर्भाच्या राजकारणात प्रचलित आहे. त्याचा फटका आजवर विदर्भालाच बसत आला आहे. हे सर्व आठवण्याचे कारण सध्या चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग हे आहे. नागपूरहून थेट मुंबईला जोडणारा हा अत्याधुनिक मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रस्तावित मार्गावर सध्या पश्चिम महाराष्ट्रातील जाणती नेतेमंडळी अगदी तुटून पडली आहेत. कोणत्याही स्थितीत मार्ग होऊ देणार नाही असे इशारे रोज दिले जात आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम एकटे फडणवीस करत आहेत, हेच यातले दुर्दैव आहे. या मार्गाचा सर्वाधिक फायदा विदर्भ व मराठवाडय़ाला होणार आहे. त्यातही जास्त फायदा विदर्भाच्याच वाटय़ाला येणार आहे. तरीही वैदर्भीय नेते या विरोधाच्या जागरात चुप्पी साधून आहेत. विदर्भातील काँग्रेसचे नेते खासगीत बोलताना या मार्गाचे कौतुक करताना थकत नाहीत. हा मार्ग झाला तर औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी भावना ते बोलून दाखवतात, पण जाहीरपणे या मार्गाचे समर्थन करण्यास हे नेते कचरतात. हा अनुभव प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीतला आहे. समृद्धीच्या संदर्भात काँग्रेसची अधिकृत भूमिका काय, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक प्रदेशनिहाय वेगवेगळे आहे. इतर प्रदेशाचे सोडा पण विदर्भातील काँग्रसचे नेते या मार्गाच्या समर्थनार्थ समोर का येत नाही? हाच मार्ग जर उर्वरित महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरणारा असता तर तेथील सर्वपक्षीय नेत्यांनी अशावेळी कशी भूमिका घेतली असती? निश्चितच तेथील नेते अशा मुद्यावर एकत्र आलेले दिसले असते. असे एकत्र येण्याचे चित्र याआधी त्या भागात अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळेच त्या प्रदेशाच्या विकासाचा वेग कायम जास्त राहिला आहे. मध्यंतरी गडकरींच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त शरद पवार आले होते. माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारणाऱ्या पवारांनी समृद्धीविषयी ब्र सुद्धा काढला नाही. विदर्भात या मुद्यावर न बोलण्याचा धोरणीपणा दाखवणारे पवार इकडून तिकडे जाताच समृद्धी विरुद्ध परिषदा घ्यायला लागले. हा धोरणीपणा विदर्भातील नेते का दाखवत नाही? पुण्याचे नवीन विमानतळ असो वा आपल्याच गडकरींनी बांधलेला एक्सप्रेस वे असो, तिकडील नेत्यांनी अशा कामांना कधीच विरोध केला नाही. या प्रकल्पांमुळे फायदाच फायदा आहे हे त्यांना दिसत होते. आता विदर्भाचा फायदा होतो आहे असे दिसताना हे नेते फडणवीसांना जेरीस आणत असतील आणि अशावेळी वैदर्भीय नेत्यांची साथ त्यांना मिळणार नसेल तर हा करंटेपणा आहे. अशी भूमिका ठेवली तर विदर्भाचा विकास कधी होणार नाही, याची जाणीव या चुप्पी साधून बसणाऱ्या नेत्यांना कोण करून देणार? प्रकल्प कोणताही असो, त्यात ज्याची जमीन जाते तो विरोध करणारच. यात नवे असे काहीच नाही. पुणे एक्सप्रेस वे ला विरोध झाला होता आणि विमानतळाला सुद्धा विरोध होतच आहे. तरीही विकास घडवून आणायचा असेल तर या विरोधाचा सामना करून सन्मानजनक तोडगा काढावाच लागतो. ज्याची जमीन जाणार त्याचे नुकसान होऊ नये, याची काळजी सरकारला घ्यावीच लागते. समृद्धीला सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाच्या मतानुसार हा विरोध केवळ १७ किलोमीटरच्या पट्टय़ात आहे. त्यातला केवळ ७ किमीचा भाग विदर्भात आहे. रस्त्याच्या एकूण लांबीच्या तुलनेत विरोधाचे हे अंतर फारच कमी आहे. तरीही विरोधकांकडून आवई मात्र मोठी उठवली जात आहे. अशा स्थितीत पक्षीय अभिनिवेश बाजूला सारत विदर्भातील नेत्यांनी समृद्धीच्या पाठीशी एकजूट उभी केली तर त्याचा फायदाच होणार आहे. या मार्गाला विदर्भातील सर्वसामान्य जनतेला विरोध आहे हे विरोधकांकडून तिकडे रंगवले जात असलेले चित्र खोटे आहे. हा खोटेपणा उघड करण्यासाठी या मार्गाच्या समर्थनार्थ मेळावे, परिषदा असे कार्यक्रम विदर्भात व्हायला हवे. खरे तर ही जबाबदारी सत्ताधारी भाजपची, पण या पक्षाचे वैदर्भीय नेते सुद्धा यात कमी पडत आहेत. या मार्गाच्या समर्थनार्थ व मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत, असे जाहीरपणे बोलण्यात भाजपचे नेते सुद्धा कमी पडत आहेत. नेत्यांचे हे मौन कशासाठी? नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यात भाजपच्या वैदर्भीय नेत्यांना कोणती अडचण असेल असे वाटत नाही. तरीही हे नेते बोलत नसतील तर तो वैदर्भीयांमध्ये असलेला अंगभूत गुण मानायचा का? समृद्धीचा मार्ग भव्यदिव्य आहे. तो पूर्ण कधी होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. राजकारणात राहून अशी भव्यदिव्य स्वप्ने बघू नये असेही बोलले जाते. मात्र, विकासासाठी अशी भव्य स्वप्ने कधीकधी गरजेची ठरतात. खूप वर्षांनंतर विदर्भाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा उचलायलाच हवा. या दृष्टीने विचार केला तर फडणवीसांची या मार्गाबाबतची आग्रही भूमिका योग्यच ठरते. विदर्भात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण असून सुद्धा केवळ अंतर जास्त आहे म्हणून अनेक समूह येथे येण्यास कचरतात. त्यामुळे होणारी हानी या मार्गाने भरून निघणार आहे. हे सारे मुद्दे विरोधकांच्या लक्षात येत नाही असेही नाही. तरीही कायम श्रेयाचा विचार करणारे वैदर्भीय नेते अशा महत्त्वाच्या मुद्यावर कायम गप्प बसतात आणि मागासलेपणाचा डंका पिटवत राहतात व उर्वरित महाराष्ट्राच्या नावाने बोटे मोडत राहतात. तिकडच्या नेत्यांनी वैदर्भीय नेत्यांच्या याच मानसिकतेचा फायदा आजवर घेतला आहे व आपल्या भागाचा विकास साधून घेतला आहे. अन्याय झाला म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवणे हे काही चांगले लक्षण नाही. अन्याय होऊच का दिला, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा असतो. त्यामुळेच विकासाच्या मुद्यावर केवळ आग्रहीच नाही तर हटवादी भूमिका प्रत्येक नेत्याने घ्यायला हवी. नेमके तेथेच वैदर्भीय नेते कमी पडत आहेत व त्याचमुळे फडणवीसांची एकाकी झुंज बघण्याचा योग वैदर्भीय जनतेच्या वाटय़ाला आला आहे.

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com