नागपूर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून पक्षांतर्गत वाद ; गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान

विदर्भातील भाजप लाटेत उपराजधानी नागपूरचा किल्ला पार भुईसपाट होऊनही काँग्रेस नेत्यांमधील लाथाळ्या काही संपण्याची चिन्हे नाहीत. या गटबाजीतून पक्षाचे नुकसान झाले असले तरी पक्षाचे नेते काही धडा घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यातूनच पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून पक्षांतर्गत वाद सुरू झाला आहे.

शहर काँग्रेसला गटबाजीचा मोठा इतिहास आहे. जेवढे नेते तेवढे गट असे सरळ गणित आहे. सध्या विलास मुत्तेमवार यांचा आणि सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद आणि नितीन राऊत यांचा असे दोन प्रमुख गट आहेत. पूर्वी आणि आत्ताही मुत्तेमवारविरुद्ध सर्वगट असे चित्र आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याचा वाद चव्हाटय़ावर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाचा वापर करत विकास ठाकरे आणि प्रफुल गुडधे यांना रोखण्याची खेळी खेळली आहे. विभागीय आयुक्तांनी घाईघाईने काँग्रेसच्या गटनेते म्हणून तानाजी वनवे यांना पत्र दिले. वनवे यांनी १७ नगरसेवकांचे पत्र दिले होते. त्यापैकी एका सदस्याची बाजू २० मे रोजी ऐकण्यात येणार होती, परंतु त्याच्या एक दिवस आधी विभागीय आयुक्तांनी वनवे यांना गटनेते म्हणून पत्र दिले. अशा प्रकारे विकास ठाकरे यांच्या स्वीकृत सदस्याच्या अर्जावर टांगती तलवार ठेवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले.

केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्ता नसताना काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी कमी होण्यापेक्षा तिला अधिक उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शहर कार्यकारिणीतील सदस्यांवरून निर्माण झालेला वाद महापालिका निवडणुकीतील पराभवानंतरही कायम आहे. महापालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपातील घोळाचा मुद्दा उपस्थित करून मुत्तेमवार विरोधी गट आक्रमक झाला, परंतु त्याला प्रदेशाध्यक्षांनी फारसे महत्त्व दिले नाही. हा वाद अधिक चिघळत गेला आणि मुत्तेमवार गटाचे महापालिकेतील विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांना पायउतार होण्याची वेळ आली. परंतु हा वाद येथे थांबलेला नाही. स्वीकृत सदस्यासाठी रस्सीखेच असून हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

शहर काँग्रेसमधील पदे प्राप्त करण्यासाठीची भांडणे शहराला नवीन नाहीत. याआधीदेखील एका गटाचा महापौर, तर दुसऱ्या गटाचा स्थायी समिती अध्यक्ष आणि सत्तापक्ष नेता अशी तडजोड करण्यात आली होती. वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा १९९८ मध्ये नागपूरच्या राजकारणात प्रवेश झाला. २००२ मध्ये त्यांच्या गटाचे विकास ठाकरे महापौर झाले. तेव्हा सतीश चतुर्वेदी गटाचे दीपक कापसे यांना स्थायी समिती अध्यक्ष करण्यात आले होते. २००५ ते २००७ दोन वर्षे चतुर्वेदी गटाचे नरेश गावंडे महापौर झाले. आमदार सुनील केदार यांनी ताकद लावून त्यांचे समर्थक दिलीप चौधरी यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवून दिले. २००७ मध्ये भाजप परत महापालिका सत्तेत आली. या वेळी सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांच्या गटाने संदीप सहारे यांना विरोधीपक्ष नेता करण्यात आले. मात्र मुत्तेमवार गटाने सहारे यांना विरोध केला. त्यामुळे सुजता कोंबाडे यांचे नाव पुढे आले. त्यांच्या विरोधात काँग्रेसमधील गटबाजी सुरू झाली. काँग्रेसमधील नेत्यांच्या लाथाळ्यांमुळे सुमारे तीन वर्षे महापालिकेत विरोधीपक्ष नेता नव्हता. त्यानंतर विकास ठाकरे हे विरोधपक्ष नेते झाले. याशिवाय गेल्या पाच वर्षे ते विरोधीपक्ष नेते होते. अशा प्रकारे काँग्रेसमध्ये सत्तासंघर्षांची परंपरा कायम आहे.

नागपूर काँग्रेसमधील वाद काही नवीन नाही. २००७च्या महानगरपालिका निवडणुकीत तर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, पण तो उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार नव्हता. कारण त्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत पत्र देण्यात आले नव्हते. असे अनेक वाद आणि परस्परांवर कुरघोडय़ा करण्याचे प्रकार नागपूर काँग्रेसमध्ये झाले आहेत. मागे अविनाश पांडे विरुद्ध सतीश चतुर्वेदी यांच्यात उमेदवारीवरून झालेला वाद गाजला होता. रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये भाजपची कधीही डाळ शिजत नसे. काँग्रेस नेते कितीही भांडले तरी नागपूरकर जनता काँग्रेसला साथ देत असे. पण आता मात्र चित्र बदलले आहे.

नगरसेवकांची ओळख परेड

काँग्रेसमध्ये नागपूर महापालिकेतील विरोधीपक्षपदासाठी तुंबळ युद्ध सुरू आहे. मुत्तेमवार गटविरुद्ध इतर असे तट पडले आहेत. महापालिकेतील काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवक तानाजी वनवे यांच्या बाजूने असल्याचे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या ओळख परेडमध्ये सिद्ध झाले. वनवे यांना गटनेते म्हणून विभागीय आयुक्तांना मान्यता दिली.

पक्षाच्या मुळावर घाव

नागपूर महापालिकेतील काँग्रेसची सदस्य संख्या ४१ वरून २९ वर आली आहे. यासाठी तिकीट वाटपातील घोळ आणि काँग्रेसमधील गटबाजी जबाबदार आहे, परंतु स्थानिक नेत्यांना पक्ष खड्डय़ात गेला तरी आपले महत्त्व कायम राहावे यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे कोणताही नेता माघार घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता परंपरागत राजकीय शत्रूशी हातमिळवणी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सर्वपक्षातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध असणे वेगळे आणि पक्षाच्या मुळावर घाव करणे वेगळे हे येथील नेत्यांना उमगत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.