महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १०८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळविल्यानंतर आता नामनियुक्त सदस्य असलेल्या पाच जागांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरांचा पदग्रहण समारंभ आणि स्थायी समिती, सत्तापक्ष नेत्यांची नावे जाहीर झाल्यानंतर नामनियुक्त सदस्य घेण्यात येणार असल्यामुळे पक्षातील अनेक इच्छुकांनी नेत्यांच्या माध्यमातून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गिरीश गांधी यांचे पुत्र निशांत गांधी आणि मुख्यमंत्र्याचे खंदे समर्थक किशोर वानखेडे यांना संधी दिली जाणार आहे.

महापालिकेत यावेळी पाच सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या टक्केवारीनुसार प्रत्येक पक्षातील नामनियुक्त सदस्यांची नियुक्ती केली जाते. यावेळी भाजपने १०८ जागी विजय मिळविला तर काँग्रेसला केवळ २९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानुसार सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. २०१२ मध्ये भाजपकडून नामनियुक्त सदस्य संजय बोंडे, प्रकाश तोतवाणी, महेंद्र राऊत तर काँग्रेसचे तनवीर अहमद आणि विजय बारसे यांचा कार्यकाळा संपला आहे. यावेळी नव्या पाच सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे तीन हजारपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले होते त्यातील १५१ उमेदवारांची निवड केल्यानंतर पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामनियुक्त सदस्यासाठी आश्वासन दिले होते. त्यामुळे अनेकांनी उमेदवारी मागे घेतली होती. भाजपकडून नामनियुक्त सदस्यांसाठी १५ नावे समोर आली असून त्यात किशोर वानखेडे, निशांत गांधी, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, प्रकाश तोतवाणी, गिरीश देशमुख, हितेश जोशी, माजी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, विद्यमान नगरसेवक गोपाल बोहरे यांची नावे समोर आली आहे. गोपाल बोहरे, गिरीश देशमुख आणि मुन्ना पोकुलवार यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली नाही. हे तिघेही पश्चिम आणि दक्षिण पश्चिमचे पदाधिकारी आहेत. हितेश जोशी हे माजी नगरसेवक असून त्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून नामनियुक्त सदस्यांसाठी आश्वासन देण्यात आल्याचे समोर आले होते. पूर्व नागपुरातून एक सदस्य घेतला जाईल. त्यामुळे त्यांचे नाव स्पर्धेत आहे.  निशांत गांधी यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना  देण्यात आली नाही. गिरीश गांधी यांची भाजपशी असलेली जवळीक बघता निशांत गांधी यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.