महापालिका प्रशासनासमोर यक्षप्रश्न

पावसाळा सुरू होताच शहरातील विविध भागातील वर्दळीच्या रस्त्यावर मोकाट आणि पाळीव जनावरांचे कळप वाढू लागले आहेत. महापालिकेने जनावरांना पकडण्याची कारवाई सुरू केली. मात्र, शहरात महापालिकेचे ४ कोंडवाडे आणि पाचशे मोकाट व पंधरा हजार पाळीव गुरेढोरे असल्यामुळे त्यांना पकडण्यात आले, तर ठेवायचे कुठे, असा यक्ष प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

शहरात असलेल्या गोठय़ांमुळे लोकांना त्रास वाढू लागला आहे. पावसाळ्यामध्ये ज्यांच्याकडे गाई आहेत त्या दिवसभर बाहेर सोडून देत असतात. त्यामुळे त्या रस्त्यावर येऊन बसतात. मोकाट गुराढोरांच्या कळपामुळे शहरातील विविध भागात रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली असली तरी त्याला होणारा विरोध बघता जनावरांचे प्रमाण गेल्या आठ दिवसात जास्त वाढले.

धरमपेठ, पारडी, गंगाबाई घाट आणि कॉटन मार्केट परिसरात महापालिकेचे कोंडवाडे आहेत. त्यातील धरमपेठ आणि कॉटन मार्केट परिसरातील कोंडवाडय़ात एकावेळी केवळ ८ ते १० गुरे राहू शकतात. शहरात एकूण ११०० गोठे असून १५ हजारावर पाळीव गुरेढोरे आहेत. यापैकी आशीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या वस्तीमध्ये सर्वाधिक गोठे आहेत, तर उर्वरित नऊ झोनमधील वस्त्यांमध्ये ६० ते ७० गोठे आहेत. मोकाट जनावरांचा उपद्रवही उत्तर नागुपरात वाढला आहे. मात्र, त्या भागात एकही कोंडवाडा नसल्याचे समोर आले आहे. कोंडवाडय़ात पकडलेली गुरेढोरे ठेवली जातात, परंतु त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना नाही. एक सुरक्षा कर्मचारी आहे आणि तोही अनेकदा जागेवर राहत नाही. त्यामुळे पकडलेल्या जनावरांची संबंधित मालकांना सुटका करून घेणे सोयीचे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी जनावरे बसलेली असतात त्याच्यावर आडोशाला उभे राहून मालक किंवा नोकराची पाळत असते. त्यामुळे कोंडवाडय़ातील कर्मचारी जनावरे पकडायला आले तर विरोध करतात आणि वेळप्रसंगी त्यांच्यावर हल्ले सुद्धा केले जातात.

नंदग्राम प्रकल्प रखडला

तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात गोपालनासाठी नंदग्राम प्रकल्प सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. पूर्व नागपुरात वाठोडा येथे या प्रकल्पासाठी ४४ एकर जमिनीची निवड करण्यात आली होती. प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. प्रकल्पासाठी शासनाने निवडलेली जागा सिवेज फार्मसाठी राखीव असून युजर चेंजसाठी शासनाकडे प्रस्ताव पडून आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास नंदग्राम प्रकल्पाला गती मिळू शकते. या प्रकल्पात १४०० चौरस फुटाचे ४६८ गोठे तयार करण्यात येणार आहे. गुराढोरांसाठी रस्ते, पाणी, वीज, दवाखान, मूत्र वाहून जाण्यासाठी नाल्याची व्यवस्था तसेच दूध संकलन केंद्र राहणार आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या प्रकल्पानुसार जनावर मालकांना गोठा बांधावा लागणार आहे.

शहरात मोकाट आणि पाळीव गुरांची संख्या बघता पावसाळ्यात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात ती बसलेली असतात. त्यांना पकडण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, गुरांची संख्या बघता महापालिका प्रशासनासमोर त्या ठेवण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यातून लवकरच मार्ग काढण्यात येईल. नंदग्राम प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे असून त्याला मान्यता मिळाली तर वाठोडा येथे शहरातील गोठे जातील. 

– प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका