महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेर प्रभागातील आणि सार्वजनिक मुद्यांवर आवाज उठवून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न काही मोजके नगरसेवक करीत असतात. जे नगरसेवक नेटाने प्रश्न मार्गी लावतात, ते कायमच राजकीय वर्तुळात चर्चेत राहतात. अशाच निवडक नगरसेवकांनी बजावलेली कामगिरी आढावा चर्चेतील चेहरे अंर्तगत घेण्यात येत आहेत. २००२ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर महापौर बनण्याची संधी मिळालेले आणि सलग तीनवेळा नगरसेवक असलेले विकास ठाकरे यांचा गेल्या पाच वर्षांत सभागृहात आणि प्रभागात बजावलेल्या कामाचा लेखाजोखा येथे देत आहोत.

विरोधी पक्षनेते नगरसेवक म्हणून ठाकरे यांनी कायम सभागृह डोक्यावर घेतले आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मिळत नसल्याने अनेकदा सभागृह बंद पाडले. या मुद्यांवर सत्ताधारी आणि पक्षातील विरोधकांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. वेगळ्या आयुधांचा वापर करून प्रश्न मार्गी लावण्याचा सल्लाही दिला. पक्षातील अनेकजण दुखावले देखील, परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

महापौर अनिल सोले असताना ठाकरे यांनी स्टार बस करारातील घोटाळा चव्हाटय़ावर आणला. तब्बल एक ते सव्वा तास या मुद्यावर सभागृहात चर्चा केली. पुरावे सादर केले. त्यामुळे महापौरांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी आरंभली आहे.

शहरातील स्मशानघाटावर लाकूड पुरवण्याचे कंत्राट दिले जाते. लाकूड पुरवठा करण्यात २ कोटींचा घोटाळा झाल्याचा मुद्दा विकास ठाकरे यांनी सभागृहात मांडला.

त्यावर चौकशी देखील झाली. शहरात खासगी कंपनीमार्फत ‘केबल डक्ट’चे काम सुरू आहे. त्यांनी नियमाचा भंग केल्याने या कंपनीविरुद्ध ५४ कोटी रुपये दंड ठोठवण्यात आला. परंतु नंतर हे दंड १४ लाखात सेटलमेंट करण्यात आले. या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करीत सभागृहात मुद्दा लावून धरला.

शहरातील पाणी वाटपाचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. यात ओसीडब्ल्यू या कंपनीला २६ कोटी रुपये अधिकचे दिल्याचा आरोप करीत सभागृहात त्यांनी गदारोळ केला. याशिवाय कचरा उचलणारी कंपनी कनक र्सिोसेस कचऱ्यासोबत माती आणि दगड वाहनात भरून तसेच वजनात फेरफार करून महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान केले आहे. हा विषय सभागृहात उपस्थित केला होता.  त्यानंतर आयुक्तांनी कंपनीकडून दंड वसूल करून विषय संपवला. या प्रकरणांवरून महापालिकेसमोर निदर्शने देखील करण्यात आली. त्यामुळे विकास ठाकरे हे कायम चर्चेत राहिले.

विकास कामे

मागील निवडणुकीप्रमाणे  प्रभाग क्रमांक ७१ मध्ये अनेक ठिकाणी नवीन उद्यान झाले आहेत आणि काही उद्यानांची कामे होत असल्याचे दिसून येते. त्यात प्रामुख्याने सुर्वेनगर, राजेंद्रनगर, शासकीस प्रेस कॉलनी, हिंगणा रोड उद्यानांचा समावेश आहे. प्रभागात डांबरी रस्ते दिसून येतात, तर सुभाषनगर ते जयताळा सिमेंट रस्ता तयार होत आहे. सुर्वेनगरात जलकुंभ उभारण्यात आले आहे.

मुख्यमंत्री, खासदार निधीतूनच विकास कामे

मुख्यमंत्री निधीतून प्रभागात विकास कामे झाली. नगरसेवकांनी कोणती कामे केली दिसत नाही. सुर्वेनगरातील रस्ता मुख्यमंत्री विशेष निधीतून करण्यात आला. नवगृहमंदिर परिसरात समाजभवन बांधण्यात आले. प्रियदर्शनी नगरात १२ लाख रुपयांचे रस्ते, एम.के. राऊत रोड, जयदुर्गा कॉलनी, एनआयटी ग्राऊंड, गेडाम लेआऊट, नेताजी कॉलनी, साईनाथ गोरले लेआऊट आदी ठिकाणी रस्ते करण्यात आले. एमआयजी कॉलनीमध्ये सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली. अहिल्यानगरात खासदार निधीतून सिमेंट रस्ता आणि टाकळी सीममध्ये ई-लायब्ररी बांधण्यात आली.

दिलीप दिवे, मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार