भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील प्रमुख सत्तापदासाठी त्यांच्या पक्षाच्यावतीने नावे जाहीर केली आहेत. रविवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवड आहे. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे. भाजपकडे संपूर्ण बहुमत असल्याने या पदाधिकाऱ्यांची निवड निश्चित आहेत. महापालिकेतील भावी सत्ताधाऱ्यांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न –

नंदा जिचकार (महापौरपदाच्या उमेदवार)

भाजपने महापौरपदाची उमेदवारी दिलेल्या नंदा जिचकार या प्रभाग ३७(क) मधून विजयी झाल्या आहेत. त्या एमएस्सी, एम.फील, बी.एड. आहेत. एम.ए. सायकॉलॉजीची परीक्षा देणार आहेत. उच्चशिक्षित असलेल्या जिचकार यांची नागपुरात जिचकार काम्पुय्टर इन्स्टिटय़ूट आहे. नागपुरात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर विवाहानंतर त्यांनी नागपूर आणि अमरावती विद्यापीठात काही वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यांचे पती शरद जिचकार हे प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. महालातील कर्नलबागमध्ये त्यांचे माहेर आहे. ‘पळसफूल’ नावाची संघटनेच्या माध्यमातून त्यांनी १३ वर्षे सामाजिक उपक्रम राबविले. सिटीझन फोरम, स्पंदन या सामाजिक संघटनाच्या कामात त्यांचा सहभाग आहे. २००१ मध्ये त्या भाजपच्या सक्रिय सदस्य झाल्या. २००२ मध्ये प्रभाग २७ देवनगर वार्डातून भाजपच्या उमेदवार म्हणून प्रथम नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत महिला शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. २००७ ते २०१२ मध्ये संघटनेत काम करीत होत्या. महिला मोर्चाच्या पालक म्हणून त्यांनी काम केले. गेल्यावर्षी पक्षाने त्यांच्यावर  पुन्हा महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली. दहा वर्षांनंतर पुन्हा नगरसेवक होण्याचा मान मिळाला व पक्षाने त्यांना महापौरपदाची संधी दिली. श्रेयश आणि प्रेयश अशी दोन मुले त्यांना आहेत. एक बंगलोर आणि मुंबईला आयआयटीमध्ये आहे. महापौर हे जबाबदारीचे पद आहे असून निवडून आल्यावर शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाच्या दृष्टीने जे मार्गक्रमण केले त्यात खारीचा वाटा म्हणून काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

दीपराज पार्डीकर (उपमहापौरपदाचे उमेदवार)

प्रभाग क्रमांक २० ड मधून निवडून आलेले दीपराज पार्डीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. ८९ मध्ये भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून काम सुरू केले. मध्य नागपुरातील बांगलादेश आणि नाईक तलाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. मध्य नागपूर हलबा आघाडीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००२ मध्ये बांगलादेश वार्ड महिलांसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी पत्नी गीता पार्डीकर यांनी निवडणूक लढविली होती आणि त्यात विजयी झाल्या होत्या, मात्र जात प्रमाणपत्राच्या कारणावरून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. ९७ मध्ये त्यांनी प्रथम महापालिकेची निवडणूक लढविली होती. विठ्ठल हेडाऊ यांनी त्यांचा ३१८ मतांनी पराभव केला होता. त्यानंतरही ते पक्ष संघटनेत काम करीत राहिले. यावेळी त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली होती. ते मध्य नागपूर भाजपचे उपाध्यक्षही होते.

संदीप जोशी (भाजपचे नवनियुक्त सत्तापक्ष नेते)

भाजपच्या दुसऱ्या फळीतील युवा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून संदीप जोशी यांची ओळख आहे. ते चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक १६ ड मधून शहरात सर्वाधिक मतांनी विजयी होऊन विक्रम स्थापित केला आहे.

वडील माजी आमदार दिवंगत दिवाकर जोशी यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. प्रथम पश्चिम आणि त्यानंतर दक्षिण नागपूर या देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांच्यासोबतच १९९० पासून जोशी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. सर्वप्रथम २००२ मध्ये प्रथम लक्ष्मीनगर प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर २००७ त्यानंतर २०१२ आणि २०१७ अशा सलग चारवेळा ते निवडून आले. २०१०मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्याच काळात नासुप्रमध्ये विश्वस्त म्हणून काम केले. स्थायी समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर २०११-१२ मध्ये त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. २०१२ मध्ये प्रारंभी स्थापत्य बांधकाम, विद्युत बांधकाम समिती सभापती आणि त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाणीपुरवठा संदर्भात आणि घरोघरी नळ देण्यासंदर्भात निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. झेप या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष असून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवितात.

संदीप जाधव (स्थायी समिती अध्यक्षपदासाठी)

महापालिकेचे कर्मचारी ते उपमहापौर आणि आता पुढच्या काळात स्थायी समितीचे अध्यक्ष असा संदीप जाधव यांचा राजकीय प्रवास आहे. यावेळी ते प्रभाग ११ मधून विजयी झाले. महापालिकेत स्थापत्य विभागात सिव्हील इंजिनिअर म्हणून २० वर्ष कार्यरत होते. १९८५ पासून भारतीय जनता पक्षाशी जुळल्यानंतर वार्ड अध्यक्ष जबाबदारी देण्यात आली होती. अनुसूचित जाती मोर्चाचे शहर सचिव आणि त्यानंतर प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. २०१२ मध्ये प्रभाग क्रमांक २४ मधून ते भाजपच्या तिकीटवर प्रथमच नगरसेवक झाले आणि त्यांना उपमहापौर होण्याची संधीही मिळाली. एक वर्ष उपमहापौर म्हणून काम केल्यानंतर गलिच्छ वस्ती सुधार विभागाचे सभापती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्थापन केलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते या समितीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. भाजपने एका सामान्य कार्यकर्त्यांला प्रथम उपमहापौर आणि यावेळी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग जन कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी करू, असा विश्वास त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.