जबर इच्छाशक्तीच्या बळावर अडचणींवर मात
दोन वैदर्भीयांनी एव्हरेस्ट मोहीम सर केल्यानंतर ट्रेकिंगचा चाहता असलेला प्रणव बांडेबुचे मोहिमेच्या शिखराजवळ असताना त्याची प्रकृती बिघडली. मात्र, जबर इच्छाशक्तीच्या बळावर त्याने त्यावर मात केली असून पुन्हा एकदा तो बुधवारी, २५ मे रोजी एव्हरेस्ट शिखराकडे वाटचाल करणार आहे. मेहकर, अकोला येथील पोलीस अधिकारी व जवानाने एव्हरेस्टला गवसणी घातल्यानंतर अवघ्या २६ वर्षीय प्रणवच्या एव्हरेस्ट मोहिमेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.
एव्हरेस्टला गवसणी घालायचीच हे प्रणवचे स्वप्न होते आणि म्हणूनच त्याची सुरुवात त्याने छोटीछोटी शिखरे सर करत केली. ऑगस्ट २०१५ मधील रशियाचे मोठे शिखर त्याने सर केले आणि एव्हरेस्टविषयीच्या त्याच्या आकांक्षा बळावल्या. सीएसी ऑलराउंडर या संस्थेत बचाव पथकाचा सदस्य असलेल्या प्रणवच्या या निर्धाराला त्याची संस्था, कुटुंबीय आणि मित्रपरिवार या सर्वानीच बळ दिले. विविध देशातील गिर्यारोहक प्रणवच्या चमूत आहे. १५ मे रोजी त्याची चमू कॅम्प दोनवर पोहोचली आणि १६ मे रोजी त्यांनी तिथेच मुक्काम केला. १७ मे रोजी ते कॅम्प तीन वर पोहोचले आणि १८ मे रोजी ते कॅम्प चारवर पोहोचले. १९ मे रोजी प्रणव आणि त्याची चमू एकाचवेळी एव्हरेस्टला गवसणी घालतील असे वाटत असतानाच प्रणवला प्रकृती बिघडली. त्याने तिथेच थांबण्याचा निर्धार केला. प्रणवच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्याला एकदाच प्रकृती अस्वास्थ जाणवले, पण इच्छाशक्तीच्या बळावर तो पुढे सरकत गेला. शिखर अगदी जवळ आले असतानाच पुन्हा एकदा त्याला तब्येतीने धोका दिला. तरीही प्रणव आता त्यातून बाहेर पडला असून पुढे आगेकूच करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. प्रणवच्या चमूतील तिघांनी शिखर सर केले आहे तर प्रणवसह उर्वरित तीन २५ मे रोजी चढाई करणार आहेत. पूर्वनियोजित वेळेत हे शिखर त्याने गाठले असते तर आतापर्यंत तो बेसकॅम्पला पोहोचला असता. तरीही निर्धार कायम असल्याने त्याने ही मोहीम अध्र्यावर सोडली नाही. त्यामुळे तो हे शिखर नक्कीच गाठेल असा आत्मविश्वास सीएसी ऑलराउंडर, कुटुंबीय व मित्रपरिवारांनी व्यक्त केला आहे. त्याच्या या वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.