रौद्र निसर्गाने दगा दिला

प्रकृती अस्वास्थ्याने त्याला दोनदा धोका दिला, पण त्यानंतरही आत्मविश्वासाच्या बळावर ‘एव्हरेस्ट’ सर करण्याच्या आसक्तीमुळे तो थांबला नाही. परंतु, एवढय़ा लवकर एव्हरेस्टला गवसणी घालणे कदाचित निसर्गालाही मान्य नसावे आणि म्हणून शिखराच्या पायथ्याशी पोहोचल्यावर निसर्गाने त्याची किमया दाखवायला सुरुवात केली. आजपर्यंतच्या वाटचालीत साथ देणाऱ्या निसर्गाने शेवटच्या टप्प्यात रौद्ररूप धारण केले आणि ‘एव्हरेस्ट’ला गवसणी घालण्याच्या तयारीत असतानाच प्रणवच्या मोहिमेला पूर्णविराम मिळाला!

नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कुही या ग्रामीण भागातून आलेला युवा गिर्यारोहक प्रणव बांडेबुचे ट्रेकिंगचा चाहता असला तरी त्याने गिर्यारोहक म्हणून एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी गेल्या दोन वर्षांत छोटीछोटी शिखरे सर करत त्याने ‘एव्हरेस्टचे’ आव्हान पेलण्याची रंगीत तालीमही सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट २०१५ मध्ये त्याने रशियातील सर्वात मोठे १८ हजार ५१० फूट उंचीचे ‘माउंट एल्ब्रस’ हे शिखर सर केले. त्याची ही धडाडी अनुभवता प्रणव ‘एव्हरेस्ट’ही सर करणार यावर त्याची संस्था, मित्र, कुटुंबीयांना पूर्ण विश्वासच नव्हे तर खात्री होती. मात्र नियतीच्या मनात वेगळीच योजना होती. दोन वैदर्भीयांनी एव्हरेस्ट गाठल्यानंतर शिखर आवाक्यात दिसत असताना त्याला तब्येतीने दगा दिला. परंतु जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने पुन्हा २५ मे रोजी एव्हरेस्टच्या दिशेने चढाई सुरू केली खरी पण निसर्गाने दगा दिला आणि शिखर गाठण्याच्या तयारीत असलेला प्रणवला अवघ्या काही अंतरावरून माघारी फिरावे लागले. प्रणवच्या चमूत देशविदेशातील गिर्यारोहक आहेत. त्यातील तिघांनी यापूर्वीच एव्हरेस्ट पादाक्रांत केले आहे.

प्रणवसह इतर तिघे प्रकृती अस्वास्थामुळे मागे पडले आणि जेव्हा अंतिम चढाई सुरू केली, तेव्हा हवामानाने त्यांना साथ दिली नाही. प्रणवचे हे स्वप्न अंतिम टप्प्यापर्यंत येऊन अखेर साकार न झाल्याची खंत सर्वानाच आहे.

मात्र, संपूर्ण मोहिमेदरम्यान दोनदा तब्येतीने दगा दिल्यानंतरही त्यावर मात करून पुन्हा शिखराकडे वाटचाल करण्याच्या त्याच्या धैर्याला

सलामच करावा लागेल. प्रणवचा परतीचा प्रवास आता सुरू झाला असून, त्याच्या माघारी परतण्यातही त्याचा ‘विजय’ आहे अशीच सर्वाची भावना असून सारेच त्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.

अशी होती प्रणवची मोहीम

प्रणवची माउंट एव्हरेस्ट ही साहसी मोहीम ५४ दिवसांची होती. नागपूर ते दिल्ली, दिल्ली ते काठमांडू व नंतर लुकला प्रयाण. तेथून नामचे बाजार ३४४३ मीटर व त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प खुंबू आईस फॉल ५३७० मीटर. येथून पहिला कॅम्प ५९०० मीटर, दुसरा कॅम्प ६२०० मीटर, तिसरा कॅम्प ७३०० मीटर, साऊथ कोल ७९२५ मीटर, शिखर ८८४८ मीटर असा मोहिमेचा कार्यक्रम होता. काठमांडूहून त्याचा प्रवास ४ एप्रिलला सुरू झाला आणि ३० मेपर्यंत त्याची मोहीम पूर्ण होणार होती.