राष्ट्रपती पहिल्यांदा एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर जातात, ते त्या राज्याच्या राजधानीच्या शहरात. परंतु नागपूरसाठी ही परंपरा मोडीत काढली. कारण येथे राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या दीक्षाभूमीला भेट देण्याची संधी मिळणार होती, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे सांगितले.

नागपूर महापालिकेने उभारलेल्या कविवर्य सुरेश भट स्मृती सभागृहाचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झाले. याप्रसंगी त्यांनी नागपूर भेटीचे कारण स्पष्ट केले. २५ जुलैला राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन निर्णय घेतले होते. दिल्लीच्या बाहेर पहिला दौरा करेन तो संरक्षण दलाच्या सन्मानासाठी. त्यानुसार २१ ऑगस्टला लेह-लडाख दौरा केला. सशस्त्र दलांचा सरसेनापती म्हणून सैन्यदलाच्या सन्मानार्थ तो दौरा होता.

दुसरा दौरा एखाद्या राज्याच्या राजधानीचा असेल असेही निश्चित केले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून निमंत्रण आल्यावर मुंबईला जाणे अपेक्षित होते. परंतु नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर भेटीचे निमंत्रण दिले. यामुळे दीक्षाभूमीच्या भेटीची इच्छा पूर्ण होणार होती, म्हणून राजधानी मुंबईऐवजी नागपूरची निवड केली, असेही ते म्हणाले.

महापुरुषांच्या यादीत हेडगेवार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्र हे संत, महात्मे आणि महापुरुषांची खाण असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील महापुरुषांची नावे घेताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याही नावाचा उल्लेख केला. महाराष्ट्राने महिला, दलितांच्या शिक्षणाची देशाला दिशा दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.