पोलीस जाताच ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी वाहने उभी

धंतोली परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी तेथील १८ मार्ग नो-पार्किंग म्हणून घोषित केले होते, तर तीन मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली होती. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक विभागाचे ४० अधिकारी व कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले होते.

मात्र, पोलीस कर्मचारी जाताच तेथील वाहतूक पुन्हा बेशिस्तीकडे जात आहे. लोक कुठेही आणि कशीही वाहने उभी करीत आहेत. एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवरून वाहनचालक बिनधास्तपणे दुहेरी वाहतूक करीत आहेत.

धंतोली परिसरातील रुग्णालये, मंगल कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमुळे परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होऊन स्थानिक रहिवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या.

त्यावर उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना धंतोलीच्या वाहतुकीसंदर्भात एकत्रित धोरण ठरविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी धंतोलीतील १८ मार्गावर नो पार्किंग झोन जाहीर केले, तर तीन मार्गावर केवळ एकेरी वाहतूक ठेवली. या अधिसूचने अंमलबजावणी होण्यासाठी प्रथम पोलिसांनी धंतोली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी फलक लावण्यात आले. जवळपास महिनाभर धंतोलीत ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असायचे.

त्यामुळे परिसरात सुरळीत वाहतूक होती. रस्त्यांवर वाहने उभी राहात नव्हती. रुग्णालये व प्रतिष्ठानांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. आता वाहतूक पोलिसांची संख्या धंतोलीतून कमी करण्यात आली. त्यानंतर तेथील वाहतूक व्यवस्था पूर्ववत होताना दिसत आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत आहेत, एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवर बिनधोकपणे दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे, रस्त्यांवर हातठेलेवाले उभे राहत आहेत. त्यामुळे धंतोली परिसरात पुन्हा पोलीस बंदोबस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

धमरपेठ परिसरात उपायुक्तांची पेट्रोलिंग

धरमपेठ परिसरातही वाहतूक पोलिसांनी काही मार्ग नो-पार्किंग जाहीर केले आहेत. कार व दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही निर्माण करण्यात आली आहे. तेथे वाहतूक पोलीस नेमण्यात आले असून नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. सध्या लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पायी पेट्रोलिंग करण्यात आले. यावेळी फूटपाथवरील अतिक्रमण आणि हातठेले हटविण्यात आले. यावेळी चेंबर-२ चे निरीक्षक जयेश भांडारकर आपल्या कर्मचाऱ्यांसह दिवसभर परिसरात होते.

ट्रॅफिक क्लबशी जुळावे

शहरातील नागरिकांच्या वाहतुकीशी निगडित समस्या सोडवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याप्रमाणे ‘ट्रॅफिक क्लब’ तयार केले. वाहतूक पोलीस अधिकारी व स्थानिक नागरिकांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. मात्र, लोकांना त्या व्हॉट्स ग्रुपमध्ये जोडण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या समस्यांचे निराकरणही करण्यात येत आहे. मात्र, अनेक लोकांना त्या भागातील ‘ट्रॅफिक क्लब’ व अ‍ॅडमिनची माहिती नसल्याने ‘लोकसत्ता’ खास पोलीस ठाण्याचा परिसर व अ‍ॅडमिन वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचे नाव व क्रमांक प्रसिद्ध करीत आहे.