उत्पादन वाढीसाठी नागपूर विद्यापीठात संशोधन

रेशीम उत्पादनात चीन पाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक असून पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उत्पादन जमेची बाजू आहे. मात्र, पर्यावरणातील असंतुलनाचा परिणाम रेशीम उत्पादन करणाऱ्या किडय़ांवरही होत असून त्या अनुषंगाने नागपूर विद्यापीठात झालेल्या एका संशोधनामुळे घटत्या उत्पादनावर मात करून उत्पादन वाढवण्याचा दावा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे.

केवळ माणूस, पशू, पक्ष्यांवरच पर्यावरणातील बदलांचा परिणाम होतो असे नाही तर रेशीम किडय़ांवरही पर्यावरणाच्या असंतुलनाचा परिणाम जाणवतो. त्यातून कमी उत्पादन आणि साहजिकच रोजगार उपलब्धतेवर ताण पडतो. विदर्भात दाभा (ट्राय- व्होल्टइन किंवा टीव्ही), दाभा (बाय- व्होल्टई किंवा बीव्ही) आणि भंडारा लोकल अशा तीन प्रजातींचे संवर्धन करून रेशीम उत्पादन घेतले जाते. टसर किडय़ांच्या वाढीसाठी २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व आद्र्रता अनुकूल असते. विदर्भात सतत बदलत असलेले तापमान, आद्र्रता आणि पर्जन्यमान अशा पर्यावरणातील घटकांचा रेशीम किडय़ांच्या वाढ तसेच जैवरसायनांवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रत्यक्ष परिणाम होतो. शेतकऱ्यांच्या टसरच्या उत्पादन वाढीसाठी टसर किडय़ांच्या संगोपनाची योग्य तयारी करून ‘येन’ आणि ‘अर्जन’ अशा दोन वनस्पतींची निवड, खाद्यपानांची गुणवत्ता, संगोपन शेतातील र्निजतुकीकरण, रेशीम किडय़ांची देखभाल आणि पर्यवेक्षण, पीक घेण्याचा काळ, रोग व किटकांपासून दूर ठेवण्यासाठी चुना आणि ब्लिचिंग पावडर, हायपोक्लोराईड आणि जीवन सुधाची फवारणी इत्यादी गोष्टी ठरावीक वेळेत कराव्या लागतात.

मनोज बांगडकर यांनी नागपूर विद्यापीठाची या विषयावरील पीएच.डी. संपादित केली आहे. सध्या ते सेवादल महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पीएच.डी.चा विषय ‘स्टडीज ऑन डिफरंट इकोरेसेस ऑफ टसर सिल्कवार्म, अँथेरिया मायलिटा (डी) फ्रॉम विदर्भ रिजन ऑफ महाराष्ट्र विथ रेफरन्स टू इटस् बायोकेमिकल अ‍ॅंड फिजिओलाजिकल आस्पेक्टस्’ या विषयावर संशोधन केले. नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील प्रा. सुरेश झाडे त्यांचे प्रमुख मार्गदर्शक होते तर पवनी येथील भूवनेंद्र राहिले त्यांचे सहमार्गदर्शक होते.

किडय़ांच्या संगोपनात संशोधनाचा फायदा

विदर्भातील तापमान, आर्द्रता, पाऊस या सतत बदलत्या पर्यावरणीय घटकांचा रेशीम किडय़ांच्या जैवरासायनिक आणि शरीरविज्ञानविषयक स्वरूपांवर परिणाम होतो. त्यासाठी वातावरणातील बदलांमध्ये रेशीम किडय़ांचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी विदर्भात मार्गदर्शन उपलब्ध नाही. त्यामुळेच मी केलेला अभ्यास टसर सिल्क प्रजाती दाबा (टीव्ही), दाबा (बीव्ही) आणि भंडारा लोकल यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यामुळे वैज्ञानिकदृष्टय़ा रेशीम (टसर) किडय़ांच्या संगोपनात या संशोधनाचा फायदा होईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा फायदा शेतकरी, आदिवासी आणि रेशीम उत्पादनात होईल.  मनोज बांगडकर, प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग, सेवादल महिला महाविद्यालय