शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यास आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा भाजपचे खासदार नाना पटोले यांनी देऊन या मुद्दावर पुढच्या काळात स्वपक्षाच्या सरकारशी दोन हात करण्याचे संकेत दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सागाच्या पानावर नाव लिहून यवतमाळ जिल्ह्य़ातील टिटवी या गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी स्थानिक खासदार आणि केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, मंत्री मदन येरावार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापैकी कुणीही भेट दिली नाही. परंतु भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सात्वन केले. कुटुंबीयाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली. शेतकऱ्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी चळवळीतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राज्यभर दौरे करणार असून यापासून आपल्याला कोणाही राखू शकत नाही, असा इशारा पटोले यांनी दिला. त्यांचा रोख भाजप श्रेष्ठी व सरकारकडे होता. यापूर्वी मी शेतकऱ्यांसाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तशीच वेळ आली तर खासदारकीही सोडेन, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून खासदार पटोले यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. केंद्र व राज्य राज्य सरकार शेतकरी आणि ओबीसीच्या प्रश्नावर योग्य पावले उचलत नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली.

‘..जर पंतप्रधानांनी वेळ दिली’

खासदार नाना पटोले म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. जर त्यांनी आम्हाला वेळ दिली तर त्यांना आम्ही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सांगू. मी भाजपमध्ये खासदार असलो तरी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार आहे आणि त्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही.