निवडणूक आयोगाचे निर्देश

मोदी लाटेवर स्वार होत एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे  वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. सरकारी जाहिरात फलकावर मोदी-फडणवीस यांच्यासह इतरही मंत्र्यांचे छायाचित्र असेल तर त्यावर पडदे टाका किंवा ते काढून टाका असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आचारसंहितेच्या काळात शासकीय खर्चाने दिलेल्या जाहिरातीत राजकीय नेत्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यावर आयोगाने बंदी घातली आहे. १६ जानेवारीला यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीत अशा प्रकारचे फलक असतील तर ते एक तर काढून टाकावे  किंवा त्यावर पडदा तरी टाकावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा हा शहरातील विकास कामे हा आहे. त्याचा प्रचार आणि प्रसारही जोरदार केला जात आहे. केंद्र आणि राज्यात पक्षाचीच सत्ता असल्याने मोदी आणि फडणवीस यांच्या प्रतिमेचा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून सरकारी योजनांच्या जाहिरातीचा पद्धतशीरपणे प्रचारासाठी वापर कसा करता येईल यादृष्टीनेही यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयात तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी  सरकारी योजनांच्या जाहिरात फलकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे छायाचित्र आहे. अशा प्रकारचे फलक जिल्हाधिकारी कार्यालयासह इतरही सकारी कार्यालयांच्या परिसरात तसेच पेट्रोल पंपासह शहरातील ठळक ठिकाणी लागलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे हे फलक काढावे लागेल किंवा त्यावर कापड (पडदे) टाकावे लागणार आहे. भाजपला आता मोदी-गडकरी आणि फडणवीस यांचे छायाचित्र असणाऱ्या जाहिरातीसाठी पक्षाच्या तिजोरीतून खर्च करावा लागणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने महापालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. या कार्यक्रमांच्या सरकारी जाहिरातीतून मोदी-फडणवीस यांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील असाच प्रकारच्या जाहिरात फलकावर आम आदमी पार्टीने आक्षेप घेत तो काढून टाकावा, अशी  मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना दिले होते. मात्र तेंव्हा आयोगाकडून याबाबत स्पष्ट स्वरुपाचे आदेश यायचे होते. आता ते आल्याने जिल्हा प्रशासनाला एक तर फलक काढावे लागेल किंवा त्यावर कापड तरी झाकून ठेवावा लागेल. नागपूर जिल्ह्य़ात जिल्हा परिषद निवडणूक नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील फलकांना हात लावला जाणार नाही, मात्र  इतर जिल्ह्य़ात या निवडणुका असल्याने तेथील फलक काढावे लागतील.