गडचिरोलीत १० हजार जवान तैनात असूनही अपयश
नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी तैनात केलेले १० हजार जवान, त्यांनी वर्षभरात राबवलेल्या ९ हजार शोधमोहिमा आणि मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या केवळ दोन! सरकारच्या नक्षलवाद निर्मूलन योजनेचे हे या वर्षांचे फलित आहे.
नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या गडचिरोलीत राज्य पोलीस दलाचे ६ हजार, तर केंद्रीय सुरक्षा दलाचे ४ हजार असे एकूण १० हजार जवान कार्यरत आहेत. नक्षलवाद्यांना संपवण्याची प्रमुख कामगिरी शिरावर असलेल्या या जवानांचा या वर्षांतील आलेख अतिशय निराशाजनक असल्याची आकडेवारी माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. या जवानांनी १५ डिसेंबपर्यंत २७१५ दीर्घ पल्ल्याच्या, तर ५९५६ कमी पल्ल्याच्या शोधमोहिमा राबवल्या. याशिवाय, शेजारच्या छत्तीसगड व तेलंगण पोलिसांच्या मदतीने २३३ संयुक्त शोधमोहिमा राबवल्या. या मोहिमांची एकत्रित संख्या ८९०४ एवढी आहे. एवढय़ा मोहिमा राबवूनही या वर्षांत २ नक्षलवादी ठार झाले आहेत. याच जवानांनी २०१३ मध्ये २६, तर २०१४ मध्ये १३ नक्षलवादी मारले होते. या वर्षांत जवान व नक्षलवाद्यांमध्ये केवळ ३० चकमकी झाल्या. २०१२ मध्ये ही संख्या ४४ होती. नंतर हा आकडा कमी कमी होत गेला. २०१२ मध्ये ४३ तर २०१३ मध्ये ४२ शस्त्रे जप्त करण्यात आली. २०१४ मध्ये यात घसरण झाली व १८ शस्त्रे जप्त झाली. या वर्षांत जवान केवळ १५ शस्त्रे जप्त करू शकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंत्रणांचा संपर्कही कमी – कदम
या संदर्भात गडचिरोली, गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नक्षलवाद्यांची संख्या घटली, त्यांनी डावपेचात बदल केले, खबऱ्यांचे जाळे आणखी विस्तारले, गावात येणे कमी केले, या कारणांमुळे यंदा यश कमी मिळाले, असे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalite beat to indian army in gadchiroli
First published on: 21-12-2015 at 01:55 IST