राष्ट्रवादी काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन

नागपूरसह राज्यभरात महिलांचे मंगळसूत्र पळवण्यासह अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत. महिलांच्या मनात भय निर्माण झाले असून त्या उघडपणे शहरात फिरूही शकत नाहीत, असा आरोप करत रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यापुढे रविभवन येथे ढोल वाजवून आंदोलन केले. महत्त्वाच्या व्यक्तींची वाटचाल असलेल्या रविभवनला आंदोलक सहज ढोल घेऊन पोहचल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

महिला तस्करीवर मुंबईत आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती देण्याकरिता विजया रहाटकर यांची रविभवनला रविवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका कांबळे आणि दिनकर वानखेडे आपल्या सहकाऱ्यांसह ढोल व नगारा घेऊन रविभवला पोहचले. सभागृहाच्या दारावर त्यांनी ढोल वाजवून आंदोलन सुरू केले. रहाटकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आंदोलकांची भेट घेतली. त्यांना आंदोलकांनी शहरातील महिलांशी संबंधित वाढते गुन्हे, मनोरुग्णालयातील अत्याचार प्रकरण, महिलांचे मंगळसूत्र पळवण्यासह इतर रोज वाढणाऱ्या महिलांच्या गंभीर घटनांची माहिती दिली.

[jwplayer dy7r2d6R]

रहातकर यांनी आंदोलकांना तुमच्या भावना योग्य असून आपण सगळ्यांनी मिळून दोषींवर कारवाईसह घटना टाळण्याकरिता एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावर आंदोलकांनी आम्हाला आश्वासन नको, एक्शन हवी असल्याचा राग आवरत पुन्हा ढोल वाजवणे सुरू केले. त्यावर संतप्त होत रहाटकर येथून निघून गेल्या. दरम्यान, नगरसेविका आभा पांडे यांनीही त्यांना महिलांशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोनात सर्वप्रथम अल्पवयीन मुले ढोल वाजवत होती, परंतु त्यांना एकाने हा प्रकार निदर्शनात आणून देताच त्यांनी ढोल स्वत: घेऊन वाजवणे सुरू केले. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सदर पोलीस ठाण्यात नेऊन विविध कायदेशीर कारवाई करून सोडण्यात आले.