पोलीस आयुक्त एस.पी.यादव यांची माहिती
रामबाग परिसरातील एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी हा तिच्या शेजारीच राहणारा युवकच आहे. पीडित मुलीवर बलात्कार केला, अशी कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे, तसेच त्याच्याविरुद्ध सर्व ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत. अद्याप या प्रकरणात एकच आरोपी दिसत असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी दिली.
शहरात तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या या रामबागेतील बलात्कार प्रकरणाचा छडा लावल्यावर शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. नितीश अनिल जैस्वाल उर्फ सोनू गुप्ता (२५,रा. रामबाग), असे या नराधमाचे नाव आहे. तो मूळचा वध्रेचा आहे. मात्र, अनेक वर्षांपासून तो रामबाग परिसरात एकटाच राहतो. आरोपी इलेक्ट्रिशियन म्हणून खासगी काम करतो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मारहाण करणे, विनयभंग करणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी आरोपीने पहाटे साडेचार वाजताच्या सुमारासही एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या २० जुलैला रात्री ७.३० ते ९ वाजेच्या दरम्यान त्याने टी.बी. वॉर्ड परिसरातील पडक्या घरात या मुलीवर अत्याचार केला. मुलगी अतिशय भेदरलेल्या आणि विचित्र अवस्थेत घरी परतल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. घटनेच्या रात्रीपासून शहरातील पोलीस इमामवाडा परिसरात तैनात होते. इमामवाडा पोलीस, परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त कार्यालय आणि गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी आपापल्या स्तरावर तपास करीत होते. शेवटी घटनेच्या वेळी परिसरातील मोबाईल टॉवरचे लोकेशन काढण्यात आले. संशयित मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी दूरध्वनी केला त्यावेळी आरोपीचा मोबाईल क्रमांक घटनेनंतर बंद झाल्याचे समजल्यामुळे पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन शोध घेतला तेव्हा घराला कुलूप लागलेले होते, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास तो पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस उपनिरीक्षक सचिन लुले, हवालदार बट्टलाल पांडे, प्रकाश वानखेडे यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी त्याची गुन्हे शाखेत कसून चौकशी केली. बराच वेळ त्याने पोलिसांची दिशाभूल केली. रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपीने गुन्ह्य़ाची कबुली दिली आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, जी. श्रीधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, शेखर तावडे उपस्थित होते.

घटनेनंतर मिशी काढली
बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी घरी परतला. सर्वप्रथम त्याने मोबाईलमधून बॅटरी आणि सीमकार्ड वेगळे केले, तसेच पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार आपली ओळख पटू नये म्हणून त्याने चेहऱ्यावरील मिशी काढली. मात्र, परिसरातील युवकांनी त्याला मुलीसोबत बघितले होते. त्यांनीही आरोपीचेच नाव पोलिसांना सांगितले होते.

द्रुतगती न्यायालयात खटला चालविणार
एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराच्या घटनेने समाजमन हळहळले आहे. शिवाय, अतिशय वाईट घटना असून या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी वैज्ञानिक स्तरावरील सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहेत. या प्रकरणाचा खटला द्रुगगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.