राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल झाल्यानंतर संघाच्या विजयादशमी उत्सवापूर्वीची रंगीत तालीम रविवारी या नव्या गणवेशातच रेशीमबाग मैदानावर झाली. त्यात शहरातील हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते.

एरवी रा. स्व. संघाचे एकत्रीकरण असो की कुठला कार्यक्रम, संघ स्वयंसेवकांना खाकी पँट आणि पांढरा शर्ट, या गणवेशाचीच सवय झालेली असताना रविवारी मात्र रेशीमबाग मैदानावर एकत्रीकरणाच्या माध्यमातून शहरातील सर्व स्वयंसेवक नव्या गणवेशात प्रथमच एकत्र येणार असल्यामुळे सर्वाना उत्सुकता होती.

रा.स्व.संघाच्या नागौरमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत स्वयंसेवकांचा गणवेश बदलाचा निर्णय झाला. खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाची फुलपँट आणि पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी, पायात काळे बूट, असा स्वयंसेवकांचा गणवेश राहणार असल्यामुळे संघ स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

१५ दिवसांवर आलेल्या दसऱ्याच्या विजयादशमी उत्सवाची नव्या गणवेशात रंगीत तालीम व्हावी म्हणून नागपूर महानगराच्या वतीने स्वयंसेवकांचे रेशीमबाग मैदानावर रविवारी एकत्रीकरण करण्यात आले होते.

रविवारी सकाळी शहरातील स्वयंसेवक पहिल्यांदाच खाकी हाफपँटऐवजी तपकिरी रंगाची फुलपँट घालून या एकत्रीकरणात सहभागी झाले होते. ज्या रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सव होतो तेथेच यानिमित्ताने स्वयंसेवकांनी कवायती, पथसंचलन, सांघिक गीते आदींचा सराव केला.  सुमारे अडीच तास ही रंगीत तालीम केल्यावर संघाच्या प्रार्थनेनंतर एकत्रीकरणाचा समारोप झाला. यानंतर विजयादशमीलाच संघ स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसणार आहेत.

नव्या गणवेशात होणारे हे पहिलेच एकत्रीकरण असल्यामुळे स्वयंसेवकांची संख्या कमी असली तरी विजयादशमी उत्सवाला दरवर्षीसारखी किंवा त्यापेक्षाही जास्त संख्या राहील.  संघाच्या पद्धतीत साधारण गणवेशात काळानुसार फेरबदल होतात, त्यामुळे अखिल भारतीय बैठकीतील निर्णयानंतर आता स्वयंसेवक नव्या गणवेशात दिसतील. विजयादशमी उत्सवाच्या विविध कार्यक्रमांची रंगीत तालीम नव्या गणवेशातच घेण्यात आली आहे.

राम हरकरे, विदर्भ प्रांत सहसंघचालक