पाण्यात राहणाऱ्या सापांमधील ‘अ‍ॅक्वाटिक रॅब्डॉप्स’ या नव्या प्रजातीचा शोध भारताच्या उत्तर-पश्चिम घाटात लागला आहे. आठ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि अभ्यासानंतर संशोधकांना हे यश मिळाले आहे. ‘झुटाक्सा’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये त्याविषयीचे सादरीकरण केले असून पेपरसुद्धा प्रकाशित केला आहे. एनसीबीएसचे डॉ. वरद गिरी, एनएचएमचे डॉ. डेव्हिड गोवर, सीईएसचे डॉ. व्ही. दीपक, आयएचएस/बीएनएचएसचे अशोक कॅप्टन, डब्ल्यूआयआयचे डॉ. अभिजीत दास, केएफआरआयचे संदीप दास आणि के.पी. राजकुमार तसेच सीव्हीएसचे आर.एल. रथिश यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणाचा हा परिणाम आहे. ‘रॅब्डॉप्स’ या पोटजातीचा साप भारतात आहे. तसेच ऑलिव्ह जंगल साप ‘रॅब्डॉप्स ऑलिव्हॅसिअस’ आणि जैवरंगी जंगल साप ‘रॅब्डॉप्स बायकलर’ या दोन प्रजातीसुद्धा आधी होत्या. ऑलिव्ह जंगल साप हा पश्चिम घाटात असून जैवरंगी जंगल साप हा भारताच्या उत्तरेकडील काही भागात आहे. ‘अ‍ॅक्वाटिक्स रॅब्डॉप्स’ ही नवी प्रजाती या दोन्ही प्रजातींपेक्षा वेगळी आहे. या प्रजातीला आधी ऑलिव्ह जंगल साप असेच म्हटले जात होते, कारण वर्ण वितरणाबाबत यात समानता आहे. केरळमधील मनंथवाडी येथून १८६३ मध्ये गोळा केलेल्या नमून्याच्या आधारावर ऑलिव्ह जंगल सापाचे वर्णन केले आहे. हे साप दुर्मीळ समजले जात होते आणि त्यानंतर केरळमधील पश्चिम घाट, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि महाराष्टातील काही ठिकाणी ते आढळून आले. तथापि, उत्तर-पश्चिम घाटातील हे साप रंग आणि वर्णाच्या बाबतीत वेगळे होते. या संशोधकांच्या चमुने डीएनए आणि इतिहासातील त्यांच्या शरीरशास्त्राचा उपयोग करून तसेच पश्चिम घाटातील विविध ठिकाणाहून नुकत्याच गोळा केलेल्या नमुन्याच्या आधारावर हा विस्तृत अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पश्चिम घाटात आता नव्या प्रजातीची नोंद झाली आहे. या सापांमधील प्रौढ साप जंगलातील ताज्या पाण्याच्या प्रवाहात आणि किशोरवयीन साप खडकाळ पठारांवर पाणी साठलेल्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात. त्यावरूनच त्याचे नामकरण ‘अ‍ॅक्वाटिक रॅब्डॉप्स’ असे करण्यात आले आहे. पाण्यात राहणाऱ्या इतर सापांप्रमाणेच ही प्रजातीसुद्धा पाण्याच्या पृष्ठभागाखाली, जलजीवांमध्ये आणि लपून राहते. किशोरवयीन आणि प्रौढ साप वेगवेगळया रंगांचे असतात. निवासस्थानांच्या पसंतीनुसार कदाचित त्यांचे रंग बदलत असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे. सध्या ही प्रजाती महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकातील काही ठिकाणी आढळते. या प्रजातीच्या मध्यम आकाराच्या सापाची लांबी सर्वाधिक ९५० मिलिमिटर असून हा बिनविषारी साप आहे.

नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्स (एनसीबीएस) बंगळुरू, नॅशनल हिस्ट्री म्युझियम(एनएचएम) लंडन, सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स (सीईएस), इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बंगळुरू, इंडियन हार्पिटोलॉजिकल सोसायटी (आएचएस) पुणे, वाईल्डलाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआयआय) देहरादून, केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट (केएफआरआय) पीची आणि कॉलेज ऑफ वेटर्नरी सायन्स (सीव्हीएस) पुकोडे यांच्या संयुक्त संशोधनातून उत्तर-पश्चिम घाटात ऱ्हॅबडॉप्सची नवी प्रजाती शोधण्यात यश आले आहे.