अवैध वृक्षतोड, अवैध चराई आणि शिकार यावर वनखात्याने शोधलेल्या तोडग्यावरून सध्या निरनिराळया प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नागलवाडी वनपरिक्षेत्रात रात्रीची गस्त, पायदळ जंगल गस्त, मचान गस्त सुरू करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला. पर्यटकांच्या सहभागातून ही गस्त नागलवाडीच्या बफर क्षेत्रात केली जाणार आहे. गस्तीदरम्यान पर्यटकांकडूनच पैसे आकारण्यात येणार असल्याने सफारी आणि गस्तीत फरक काय, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असताना वनखात्याने हा मुद्दा खोडून काढला आहे.
वनपर्यटनाच्या माध्यमातून या प्रकारांना आळा बसावा आणि वनसंरक्षणाला चालना मिळावी तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागलवाडी वनपरिक्षेत्रातून रात्र गस्त, पायदळ जंगल गस्त, मचान गस्तीचा प्रयोग राबवण्याचा निर्णय अलीकडेच वनखात्याने घेतला.
यात पर्यटकांना सहभागी करून घेतले जात असले तरीही त्यांच्याकडूनच या तिन्ही प्रकारच्या गस्तीसाठी पैसे आकारले जाणार आहेत. रात्र गस्तीसाठी २ हजार रुपये, पायदळ गस्तीसाठी ५०० रुपये आणि मचान गस्तीसाठी सामुदायिक २ हजार रुपये असे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ग्राम परिस्थितीकीय समिती नागलवाडी आणि ५० टक्के रक्कम पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानकडे जमा करण्यात येईल. मात्र, किती पर्यटक वनखात्याच्या या प्रयोगाला प्रतिसाद देतील याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे.
राज्याच्या वनखात्याने पर्यटनाच्या नावाखाली अक्षरश: वन्यजीवांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची टीका अलीकडच्या काळात होत आहे. १५ दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या वाघांच्या मृत्यूवरून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
तरीही आता पुन्हा हा गस्तीचा प्रकार म्हणजे शिकाऱ्यांना आमंत्रण देण्याचा प्रकार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गस्तीसाठी येणाऱ्या पर्यटकांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे, पण ओळखपत्राची सत्यता तपासण्याची यंत्रणा वनखात्याकडे नाही. त्यामुळे खोटी ओळखपत्र बनवून शिकारीसुद्धा या गस्तीत सहभागी होऊन रेकी करतील आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मार्ग मोकळा होईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

वाघाच्या जीवाला धोका
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागलवाडी येथे प्रायोगिक तत्त्वावर पर्यटकांच्या सहभागातून गस्त करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला असतानाच, काल रविवारला या ठिकाणी वाघाचे अस्तित्त्व आढळून आले. त्यामुळे प्रायोगिक तत्त्चावरच्या या गस्तीवर वनखात्याला गांभीर्याने नजर ठेवावी लागणार आहे. अन्यथा हा निर्णय वाघाच्या जीवावरसुद्धा बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘निर्णयाचा फेरविचार व्हावा’
पैसे देऊनच गस्त करायची असेल तर जंगल सफारी काय वाईट आहे. गस्तीत आमच्यासारख्या पर्यटकांना सहभागी करून घेणे ही चांगली बाब, पण आमच्याकडूनच पैसे आकारण्याचा प्रकार न पटणारा आहे. पैसे देऊन गस्तीत सहभागी होणारा प्रत्येक पर्यटक गस्तीच्या उद्देशानेच सहभागी होईल असे नाही. पर्यटकाच्या चेहऱ्याआड शिकारीसुद्धा दडला असू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा या निर्णयावर विचार करणे गरजेचे आहे.

‘जंगल व्यवस्थापनाला हातभार’
गस्ती आणि पर्यटन हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा वनरक्षक यांना दररोज रात्री गस्त घालून पुन्हा सकाळी नोकरीवर हजर होणे शक्य नाही. त्यामुळे पर्यटकांना यात सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे जंगलाचे व्यवस्थापन त्यांना कळेल. याशिवाय जंगल आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेत त्यांचा हातभार लागेल. त्यांच्याकडून पैसे घेण्यामागे जंगलाच्या व्यवस्थापनाला हातभार लागेल. गाईड आणि वनरक्षक सोबत असल्यामुळे पर्यटकांकडून काही अनुचित घटना घडेल, असे वाटत नाही. कारण, वाहनांचे क्रमांक, त्यांचे ओळखपत्र आदींची नोंद वनखात्याकडे राहील आणि तशी शंका आल्यास वनखात्याकडे असलेल्या माहितीवरून त्यांच्यावर कारवाई करता येईल.