गडकरींची घोषणा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच नागपूर- हैदराबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या द्रूतगती एक्स्प्रेस महामार्गावर लवकरच काम सुरू केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

भाजपच्या महानगर कार्यकारिणीची सभा रविवारी लक्ष्मीनगर मैदानावर पार पडली. यावेळी बोलताना गडकरी यांनी ही घोषणा केली. नागपुरातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला. शहरात सुरू असलेल्या विकासकामांचीही माहिती त्यांनी दिली. नागपुरातील नव्या विमानतळाच्या कामाच्याही निविदा लवकरच निघतील. प्रत्येक जिल्ह्य़ात ८ ते १० हजार कोटींची कामे सुरू आहेत. राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. सीताबर्डी येथील यशवंत स्टेडियम आणि आसपासच्या जमीन संपादित करून त्याठिकाणी एक जागतिक दर्जाचे भव्य स्टेडियम बांधण्याचे प्रस्तावित आहे. पत्रकार संघानेही पत्रकार भवनाची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, असेही गडकरी म्हणाले.

उत्तर नागपुरात सिकलसेल संशोधन संस्था

उत्तर नागपुरातील आंबेडकर रुग्णालयाच्या ४ एकर जागेवर सिकलसेल, थॅलेसिमियाच्या रुग्णांसाठी संशोधन संस्था आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच शहरात इलेक्ट्रीक बस सुरू करण्यात येणार आहे. मल्टीमॉडेलसाठी कार्गो हब ८०० कोटी मंजूर झाल्याचेही गडकरी म्हणाले.

आमदार मानेंची माध्यमांवर आगपाखड

लक्ष्मीनगरातील मैदानावर भाजपच्या महानगर कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात बोलताना माने यांनी माध्यमांना लक्ष्य केले. शहरातील आमदारांविषयीच्या वृत्ताने ते विचलित झाले आणि त्यांनी थेट बातमीदारांना आव्हान दिले. आमदाराविषयीचे वृत्त कशाच्या आधारावर प्रकाशित करण्यात आले, असा सवाल करताना ही बातमी लिहिणाऱ्या बातमीदाराने माझ्याकडे यावे, मी त्याला नापस करतो, असे आमदार माने म्हणाले.

भाजपला १७५ जागा मिळतील – बावनकुळे

केंद्र व राज्य सरकारावर लोक खुश असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला १७५ जागा मिळतील, असा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते एवढय़ावरच थांबले नाही तर एका सर्वेचा हवाला देत ते म्हणाले, राज्यातच नव्हे तर केंद्रातही पुन्हा भाजप सत्तेत येणार आहे. भाजपला केंद्रात ३९९ जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असे  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.