जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्यासाठी वायदे बाजार कारणीभूत आहे, असे केंद्रातील काही मंत्र्यांचे मत असल्याने पुढच्या काळात सरकार यावर बंदी घालू शकते, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित वायदे बाजारावरील परिसंवादात ते बोलत होते. विशेष म्हणजे, बाजार समितीत राष्ट्रीय वायदे बाजाराचे केंद्र (एनसीडीईएक्स-नॅशनल कमोडेटी अ‍ॅण्ड डेरिव्हेटिव्हज एक्सचेंज) सुरू करावे म्हणून समितीने परिसंवाद आयोजित केला होता. गडकरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. वायदे बाजाराला आपले समर्थन किंवा विरोध नाही, असे स्पष्ट करताना गडकरी यांनी याचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या संदर्भात दिल्लीत अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा हवाला देत ते म्हणाले की, या बैठकीत भाववाढीसाठी वायदे बाजार कारणीभूत असल्याचे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले होते.
त्यामुळे पुढच्या काळात केंद्र सरकार यावर बंदी आणण्याबाबत निर्णय घेऊ शकते. वायदे बाजारात फक्त भाव ठरतात, मालाची देवाण-घेवाण फक्त कागदोपत्रीच केली जाते. त्यामुळे हा एक प्रकारे जुगारच ठरतो. यात काही बदल झाले आणि याचा फायदा जर शेतकऱ्यांना होत असेल तर यासंदर्भात बाजार समितीने अभ्यास करावा, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सुनील केदार उपस्थित होते. त्यांनी वायदे बाजाराचे केंद्र बाजार समितीत सुरू करण्याबाबतची भूमिका मांडली.