केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
महाराष्ट्रातील पाणीसंकट गंभीर असून ते सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ क्रिकेट सामने रद्द करून हा प्रश्न सुटणार नाही, असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हाणला. केंद्र सरकारच्या एआयबीपी योजनेतून महाराष्ट्रातील प्रकल्पांना मिळणाऱ्या निधीच्या संदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येणार असून यात पाणी प्रश्नांवर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आज, शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पाणी प्रश्नासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडय़ात पाणी संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. पाण्याची चणचण लक्षात घेऊन महाराष्ट्रातील आयपीएल सामने राज्याबाहेर हलविण्याचा निर्णय झाला. या पाश्र्वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
ते म्हणाले की, पाणीप्रश्न गंभीरच आहे, पण केवळ क्रिकेट सामने इतरत्र हलविल्यामुळे तो सुटणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन योजना तयार कराव्या लागतील. महाराष्ट्राने सिंचनासाठी फक्त ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तुलनेत छोटय़ा तेलंगणाने आपल्यापेक्षा दुप्पट रक्कम सिंचनासाठी ठेवली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने एआयबीपी योजनेसाठी ८० हजार कोटी रुपये, तर पंतप्रधान सिंचन योजनेसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एआयबीपी योजनेत राज्याचे २८ सिंचन प्रकल्प आहेत. त्यात विदर्भातील गोसेखुर्दचाही समावेश आहे. यातून राज्यातील प्रकल्प कसे पूर्ण होतील, याचा प्रयत्न करण्यासाठी येत्या काही दिवसातच मुंबईत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यासोबत बैठक घेतली जाईल. पावसाचे पाणी अडविण्यासाठी ब्रीज बंधारे, रबर बंधारे यासारखे प्रयोग राज्यात करता येईल का, याबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे गडकरी म्हणाले.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकडे त्यांचे लक्ष वेधले असता, यावर त्यांनी काहीही बोलणे टाळले. या मुद्यावर यापूर्वीच आपण भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते म्हणाले. गडकरी यांनी यावेळी त्यांच्या खात्याकडून सुरू असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कामांची माहिती दिली. देशभरातील बँका अडचणीत असताना या प्रकल्पांसाठी निधी कसा उभा करणार, असा प्रश्न त्यांना केला असता, आपल्या खात्याकडे निधीचा तुटवडा नाही, हे त्यांनी आकडेवारीनिहाय स्पष्ट केले.

मिहानला गती देण्याची गरज
नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. अनिल अंबानी यांनी घोषणा केल्यानंतरही त्यांचा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही, मिहानच्या मार्केटिंगची घोषणाही पूर्ण झाली नाही. मिहान टास्कफोर्सचे अध्यक्ष म्हणून यासंदर्भात गडकरी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, यापुढे त्याला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गडकरी म्हणाले.
‘नागपूरकडे लक्ष दिल्याने इतर भागातून टीका’
आपण नागपूरचे खासदार असल्याने या भागात, तसेच विदर्भातही जास्तीतजास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न करतो. कोटय़वधी रुपयांची कामे या भागात मंजूर झाली. मात्र, त्यामुळे राज्यातील इतर भागातून आपल्यावर टीका होते, असे गडकरी म्हणाले.