नितीन गडकरी यांची कबुली

”सर्वसामान्यांना नोटाबंदीचा त्रास झालाच. मात्र, श्रीमंतांवर पडणाऱ्या छाप्यांमुळे ते खूश होते. त्यामुळे तो राग दिसून आला नाही” अशी जाहीर कबुलीच रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. देशपांडे सभागृहात आयोजित राष्ट्रीय कारागीर पंचायत संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर चलनटंचाई निर्माण झाली. त्यात सर्वसामान्य जनता सर्वाधिक भरडली गेली. मात्र, सरकार पातळीवरून या निणयाचे समर्थनच करण्यात आले. गडकरी यांनी मात्र रविवारी यासंदर्भात जाहीर कबुली देऊन लोक या निर्णयामुळे त्रस्त होते हे मान्य केले.

कारागिरांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुद्दावरून त्यांनी आयुर्वेदिक औषधांचा हवाला दिला. या क्षेत्रात रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाने केलेल्या प्रगतीचे उदाहरण दिले. आयुर्वेदिक औषधांची विक्री व इतर वस्तूंची बाजारपेठ रामदेवबाबा यांच्या पतंजलीने काबीज केल्याने हा उद्योग समूह नफ्यात आला. एका साध्या बाबाकडे कोटय़वधी रुपयाची संपत्ती आल्याने लोकांच्या मनात शंका येते. त्यामुळे मी बाबांना संपत्ती दान करण्याचा सल्ला दिला. कारण श्रीमंतांविषयी गरिबांच्या मनात चीड असते. हीच बाब नोटाबंदीतूनही दिसून आली. गरिबांना नोटाबंदीचा त्रास झाला. मात्र, ते श्रीमंतांवर होणाऱ्या कारवाईमुळे खूश होते, असे गडकरी म्हणाले.

गडकरी यांच्या वक्तव्यामुळे सरकारकडून करण्यात येणाऱ्या नोटाबंदीच्या समर्थनाचा फोलपणा पुन्हा स्पष्ट झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यापासून तर माजी मंत्री अरुण शौरी यांच्यापर्यंत अनेकांनी नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे त्यांना पक्षातूनही टीकेला तोंड द्यावे लागले. आता खुद्द गडकरी यांनीच नोटांबदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकार ही बंद गाडी!

  • सरकार बंद गाडीसारखे असते. या गाडीला धक्का मारावा लागतो, तेव्हा कुठे गाडी चालायला लागते.
  • केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन साडेतीन वर्षे झाली. पण, कारागिरांचे प्रश्न घेऊन सरकारकडे कोणीच आले नाही. तेव्हा त्यांचे काम कसे होणार, असा सवालही गडकरी यांनी केला.
  • प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसमोर किमान ओरडावे लागते. तेव्हा ते काम करायला लागते, असे गडकरी म्हणाले.