विधान परिषदेचा उमेदवार व मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार, या विषयावर शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली.
दिवसभराचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री महालातील गडकरी वाडय़ावर पोहोचले. एरवी मुख्यमंत्री कुठे जात असतील तर त्यांच्यामागे गाडय़ाचा ताफा असतो. मात्र, काल रात्री त्यांच्यासोबत एकच सुरक्षा रक्षकाची गाडी होती. मुख्यमंत्री आले त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीहून वाडय़ावर पोहोचलेलेच नव्हते. त्यामुळे गडकरी यांच्या कुटुंबीयांनी आणि स्वीय सचिवांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री पोहोचताच दहा ते पंधरा मिनिटांनी गडकरी पोहोचले आणि दोघांमध्ये विधान परिषदेचे निवडणुकीसाठी उमेदवार आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळावरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
उमेदवारीसाठी स्पर्धा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने दोन नावे समोर आली असून त्यात महापौर प्रवीण दटके व पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांचे नाव आहे. नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गिरीश व्यास यांनी विधानसभा निवडणुकीत मध्य नागपुरात उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यावेळी त्यांना डावलून विकास कुंभारे यांना ती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असले तरी दटके यांचे नाव समोर आले आहे.