गडकरींचा सिमेंट कंपन्यांना इशारा

सिमेंटचे भाव वाढवून जनतेचे शोषण कराल तर तुमचा ‘बँड’ वाजवू असा इशारा सिमेंट कंपन्यांना देऊन सरकारच्या बंद पडलेल्या सिमेंटच्या दहा कंपन्या लवकरच सुरू करणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

फ्यूचर स्पलाय चेन सोल्युशन्स लि.च्या स्वयंचलित हाय स्पीड क्रॉस बेल्ट सॉर्टेशनचा प्रारंभ मिहानमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मिहानमध्ये मोठय़ा प्रमाणात उद्योग येत असून त्यातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. सिमेंटचे दर कमी होऊ शकतात. कंपन्या मक्तेदारी निर्माण करीत दर कमी करीत नसतील तर सरकार त्यासाठी पुढाकार घेईल. बंद पडलेल्या दहा सरकार सिमेंट कंपन्याचे प्रस्ताव आले आहेत. या कंपन्या सुरू करून सिमेंट स्वस्तदरात बाजारात आणले जाईल. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी अर्थव्यवस्थेचा अंगिकार करण्यात आला. त्या अर्थव्यवस्थेने केवळ इन्स्पेक्टर राजला बळकटी दिली. या व्यवस्थेने केवळ भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले. त्यातून कायदे सामान्याचे शोषणकर्ते झाले. नवीन कंपन्या आता मिहानमध्ये येत असल्यामुळे त्यांचे काम सुरू झाले आहे तर काहींशी लवकरच करार केले जाणार आहेत.

यापूर्वी मिहानमध्ये अनेक कंपन्या आल्या पण आधीच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांमुळे विदर्भाचा विकास मंदावला. त्यामुळे अनेक कंपन्या मिहानमध्ये येऊ शकल्या नाही, अशी टीका गडकरी यांनी नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. मिहानमध्ये अतिशय कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर या ठिकाणी उद्योगांशी संबंधित सोयीसुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. विदेशी कंपन्या मिहानमध्ये येत असल्यामुळे त्यांच्यासोबतचे करार लवकरच केले जाणार असून तीन-चार महिन्यांत नव्या कंपन्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी फ्युचर कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी उपस्थित होते.

मल्टी मॉडेल हब

सिंचन क्षमता वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागपुरात विमानतळासाठी लवकरच निविदा निघणार आहे. नागपूर आणि वाराणसी येथे मल्टी मॉडेल हब होणार आहे. सत्तेत आलो तेव्हा १३ लाख कोटी रुपयांचा महसूल होता. मात्र, आता २० लाख कोटींचा  झाला आहे. येणाऱ्या दिवसात तो जीएसटी आल्यावर सुद्धा ३० लाख कोटींपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीएसटी लागू होताच व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, आता त्यांनी काळे धंदे बंद केले पाहिजे, अशी समज त्यांनी व्यापारांना दिली. देशभरात तूर डाळीचा प्रश्न निर्माण झाला असला तरी राज्य सरकारने त्या संदर्भात पावले उचलली आहेत. तुरीच्या प्रश्नाबाबत आपण लवकरच कृषी मंत्र्यांना सुद्धा भेटणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.